टोकियो – ऑलिम्पिक स्पर्धा २०२० मध्ये आज भारतीय महिला हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी करत विजय मिळविला आहे. भारतीय महिला संघाने शानदार खेळाचे प्रदर्शन करीत दक्षिण अफ्रिकेवर विजय मिळविला. भारताने अफ्रिकेचा ४-३ असा पराभव केला. या सामन्यात भारताची वंदना कटारियाने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले. तिने गोलची हॅट्ट्रिक केल्याने भारताला हा सामना जिंकता आला. तसेच, ऑलिम्पिकमध्ये गोलची हॅट्ट्रिक करणारी वंदना कटारिया ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
भारतीय महिला संघाने पहिल्या सामन्यात आयर्लंडला नमवलं आहे. त्यानंतर आता दक्षिण अफ्रिकेला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या उपांत्य फेरीच्या प्रवेशाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेतत प्रथमच महिला भारतीय संघाने अशी चमकदार कामगिरी केली आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना अतिशय रंगतदार झाला. सर्वप्रथम भारतीय संघाने गोल करुन आघाडी घेतली. त्यानंतर अफ्रिका संघाने गोल करुन प्रत्युत्तर दिले. त्यानंतर पुन्हा दोन्ही संघांनी एक-एक गोल करत ३-३ अशी बरोबरी साधली. आता पुढे काय होणार याची मोठी उत्सुकता लागलेली असतानाच वंदनाने शानदार गोल करीत भारताला विजय प्राप्त करुन दिला.