नवी दिल्ली – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय क्रीडापटूंच्या चमूशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (१३ जुलै) दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
पंतप्रधानांचा हा संवाद म्हणजे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यापूर्वी, या क्रीडापटूंना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी अलीकडेच टोकियो-२०२० मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या चमूच्या सुविधांच्या सज्जतेचा आढावा घेतला होता. त्यांनी ‘मन की बात’ मध्ये काही खेळाडूंच्या प्रेरणादायी प्रवासाविषयीही चर्चा केली होती. त्याशिवाय देशवासीयांनी पुढे येऊन या खेळाडूंना मनःपूर्वक पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी देशाला केले होते. युवा व्यवहार व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, युवा व्यवहार व क्रीडा मंत्री राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक आणि कायदा मंत्री किरेन रिजिजू या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
भारतीय चमू बद्दल
भारताकडून १८ क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणारे एकूण १२६ खेळाडू टोकियोला जात आहेत.आतापर्यंतच्या कोणत्याही ऑलिम्पिकमध्ये भारत पाठवत असलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा चमू आहे. १८ क्रीडा प्रकारांमधील मधील एकूण ६९ स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी होणार असून ही देशाची आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे.
हे पहिल्यांदाच जाणार
भारतीय खेळाडूंच्या सहभागाच्या दृष्टीने बर्याच विलक्षण गोष्टी आहेत. इतिहासात प्रथमच, एक भारतीय तलवारबाज (भवानी देवी) ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. ऑलिम्पिक खेळांसाठी पात्र ठरलेली नेथ्रा कुमानन ही भारताची पहिली महिला नाविक आहे.जलतरणातील ‘अ’ पात्रता मानांकन प्राप्त करून ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेले साजन प्रकाश आणि श्रीहरी नटराज हे पहिले जलतरणपटू आहेत.