टोकियो – क्रीडा स्पर्धेचा महाकुंभ समजल्या जाणार्या ऑलिम्पिकमध्ये शनिवारी (७ ऑगस्ट) गोल्फ स्पर्धेत भारतीय गोल्फपटू अदिती अशोकचे पदक थोडक्यात हुकले. कोणतीही आशा नसताना अदितीने जबरदस्त कामगिरी केली. एका स्ट्रोकमुळे तिचे पदक हुकले. ती चौथ्या क्रमांकावर राहिली. अदितीला पदक मिळाले नसले तरी शानदार खेळीने अव्वल भारतीय गोल्फपटूंच्या यादीत तिचे नाव घेतले जाईल.
तत्पूर्वी आजच्या चौथ्या फेरीचा खेळ सुरू झाला तेव्हा अदितीने आपल्या खेळाने सर्वांनाच प्रभावित केले. तिसर्या फेरीत रौप्यपदकाच्या शर्यतीत असलेली अदिती चौथ्या फेरीत चौध्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. अमेरिकेची नेली कोर्दा पहिल्या स्थानावर राहिली. तिने सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. जापानची मोनी इनामी दुसर्या स्थानावर राहून तिने रौप्यपदक आणि न्यूझीलंडची लिडिया को तिसर्या स्थानावर राहून तिने कांस्यपदक आपल्या नावावर केले आहे. दरम्यान, खराब हवामानामुळे खेळ थांबविण्यात आला होता.
बजरंग, नीरजकडे लक्ष
आजचा सोळावा दिवस भारतासाठी महत्त्वाचा आहे. सर्वांच्या नजरा कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्यावर खिळल्या आहेत. प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देण्यासाठी ते सज्ज आहेत. कुस्तीच्या ६५ किलो वजनीगटात कांस्य पदकासाठी ४ वाजून १० मिनिटांनी सामना सुरू होणार आहे, तर भालाफेक स्पर्धेचा अंतिम सामना ४ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल. पंधरा दिवसांत विविध खेळांमध्ये भारताने दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकांसह पाच पदकांवर नाव कोरले आहे.