टोकियो – येथील पॅरॉलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतासाठी पुन्हा एकदा सुवर्णयोग जुळून आला आहे. भारताचे नेमबाज मनीष नरवाल आणि सिंहराज यांनी पी ४ मिश्रित ५० मीटर पिस्तुल एसएच १ प्रकारात सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवून चमरदार कामगिरी केली आहे. पदकतालिकेत आता भारताच्या नावावर १५ पदके झाली आहेत. त्यामध्ये ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ कांस्यपदकांचा समावेश आहे. मनीष नरवालने २१८.२ गुण मिळवून सुवर्ण, सिंहराजने २१६.६ गुण मिळवून रौप्य आणि रशियन सेर्गेई मालिशेव यांनी १९६.८ गुणांसह कांस्यपदक पटकावले. यापूर्वी भारताचे अॅथलिट अवनी लेखराने नेमबाजीत आणि सुमीत अँटिल याने पुरुष भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली आहेत. पात्रता फेरीत मनीष नरवाल ५३३ गुणांसह सातव्या स्थानावर तर सिंहराज ५३६ गुणांसह चौथ्या स्थानावर होता. सिंहराजच्या नावावर हे दुसरे पदक आहे. यापूर्वी त्याने दहा मीटर एअर पिस्तुल एसएच१ मध्ये कांस्यपदक जिंकले होते.
दरम्यान, बॅडमिंटनपटू प्रमोद भगत यांनी अंतिम फेरी गाठली. पुरुष एकेरीत एसएल३ वर्ग उपांत्यफेरीत भगत यांनी जापानच्या फुजिहाराचा २-० अशा फरकाने पराभव केला. आता प्रमोद यांनाही सुवर्णपदक जिंकण्याची संधी निर्माण झाली आहे.