नागपंचमी महात्म्य
पंडित दिनेश पंत
श्रावण महिना हा सणांचा महिना मानला जातो. त्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. आपल्या सणवारा मध्ये निसर्गातील प्रत्येक घटका प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. नागपंचमी ही त्या भावनेनेच साजरी केली जाते.
नागपंचमीचा उद्देश
साप, नाग हे एक प्रकारे शेतकऱ्याच्या कामात मदत करत असतात. शेतीतील उभ्या पिकांची नासाडी करणारे उंदीर हे साप किंवा नाग खाऊन नष्ट करतात. भगवान शंकर यांच्या गळ्यात नागाचे स्थान आहे. तसेच भगवान विष्णू शेषशाई (नाग शय्या) स्वरूप आहे. श्री गुरु दत्तात्रेय यांच्या २४ गुरुंपैकी एक नाग आहे. माहेरवाशिणीचा सण म्हणून देखील नागपंचमीला महत्त्व आहे. या दिवशी माहेरवाशिणी माहेरी येतात. पाटावर नागाची रांगोळी काढून अथवा चित्र काढून नागोबाची पूजा करतात. उंच उंच झोके, गाण्याच्या भेंड्या, ओव्या खेळतात.
नागपंचमी पूजा विधी व साहित्य
एका पाटावर नाग, नागिन व त्यांची दोन पिल्ले यांचे चित्र काढावे. त्यास हार, फुले वाहून मनोभावे पूजा करावी. दूध, लाह्या, पुरणाचे दिंड याचा नैवेद्य दाखवावा. काही पौराणिक कथांमध्ये नाग किंवा सापांना भाऊ अर्थात रक्षण कर्ता मानले गेले आहे. त्या भावनेने देखील नागोबाचे पूजन केले जाते. आजच्या दिवशी बऱ्याच घरांमध्ये भाजी चिरणे, तवा ठेवणे या कृती पूर्वापार करत नाहीत. वाफवलेले अन्नपदार्थ यांना आज विशेष महत्त्व असतं. रात्री नागपंचमीचा जागर केला जातो, त्यामध्ये फुगड्या, गाण्याच्या भेंड्या, ओव्या, पारंपारिक गाणी गायली जाऊन आनंद साजरा केला जातो.