पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय संस्कृतीत म्हणजेच वैदिक हिंदू धर्मात श्री गणेश अर्थात गणपतीला विशेष महत्त्व आहे. चतुर्थी तिथी गणेश पूजनाला समर्पित असून आपल्या पंचांगानुसार, प्रत्येक महिन्याच्या दोन्ही चतुर्थी तिथीला गणपतीची पूजा केली जाते. या दिवशी विधिवत पूजा केल्याने गणपतीचा आशीर्वाद मिळतो. तसेच व्यक्तीची सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होतात. विधिवत पूजन आणि काही उपाय केल्याने गणपती प्रसन्न होत भक्तांचे सर्व संकट दूर करतो. त्यामुळे गणपतीला विघ्नहर्ता देखील म्हटले जाते.
सध्या मराठी वर्षातील मार्गशीर्ष महिना सुरु आहे. या महिन्यातील संकष्ट चतुर्थी रविवार, दि. ११ डिसेंबर रोजी आहे. हाती घेतलेले कार्य निर्विघ्नपणे पार पडावे, यासाठी बाप्पाला प्रार्थना केली जाते. तसेच गणपती बाप्पाची आपल्याला शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. या दिवशी विविध शहरांतील चंद्रोदय वेळ आणि व्रतपूजन जाणून घेणे आवश्यक आहे.
मोदक अर्पण करा
गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनाने होते. संकष्टी चतुर्थी व्रत श्रीगणेशाची कृपा मिळविण्यासाठी केला जातो. या दिवशी गणपतीची विधीपूर्वक पूजा केली जाते. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी मंदिरात जाऊन गणेशाची पूजा केली पाहिजे. गणपतीला मोदक अतिप्रिय असल्याने पूजेच्या वेळी गणेशाला मोदक अर्पण करावे, असे केल्याने भगवान गणपती लवकर प्रसन्न होऊन भक्तांवर कृपा करतात.
संकष्ट चतुर्थीचे महत्त्व
गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणपती व्रत केले जाते. यातील वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी व्रत करण्याची प्राचीन परंपरा सुरू आहे. सकाळी स्नानादी कार्ये उरकल्यानंतर एका चौरंगावर गणपतीची स्थापना करावी. गणपतीची षोडशोपचार पूजा करावी. गोडाचा नैवेद्य दाखावावा. दिवसभर उपास केल्यानंतर चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. त्यानंतरच भोजन करावे. विशेष म्हणजे चंद्रदर्शन हा या व्रतातील महत्त्वाचा भाग आहे. यात डिसेंबरमधील चतुर्थीला सर्वार्थ सिद्धिनामक विशेष योग जुळून येत आहे. या योगात केलेले पूजन शुभ मानले जाते. व्रत करणाऱ्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात, असे म्हटले जाते. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अर्पण करतो.
आजची चतुर्थी
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी ही रविवार, दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी असून चतुर्थी समाप्ती: सोमवार, १२ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०६ वाजून ४८ मिनिटे. भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण आणि पूजन रविवार, ११ डिसेंबर २०२२ रोजी करावे, असे सांगितले जाते.
अशी करा पुजा
महत्त्वाचे म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. त्यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा.
विविध शहरांतील चंद्रोदय वेळ अशी
मुंबई……. रात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे
ठाणे…… रात्रौ ०९ वाजून ०१ मिनिटे
पुणे….. रात्रौ ०८ वाजून ५९ मिनिटे
रत्नागिरी…… रात्रौ ०९ वाजून ०५ मिनिटे
कोल्हापूर……. रात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे
सातारा ……रात्रौ ०९ वाजून ०१ मिनिटे
नाशिक…… रात्रौ ०८ वाजून ५६ मिनिटे
अहमदनगर……. रात्रौ ०८ वाजून ५४ मिनिटे
भुसावळ………. रात्रौ ०८ वाजता ४५ मिनिटे
नांदेड….. रात्रौ ०८ वाजून ४३ मिनिटे
उस्मानाबाद ………रात्रौ ०८ वाजून ५१ मिनिटे
भंडारा……. रात्रौ ०८ वाजून २९ मिनिटे
बुलढाणा…… रात्रौ ०८ वाजून ४५ मिनिटे..
धुळे…….. रात्रौ ०८ वाजून ४९ मिनिटे
जळगाव……. रात्रौ ०८ वाजून ४६ मिनिटे
यवतमाळ……. रात्रौ ०८ वाजून ३७ मिनिटे
बीड….. रात्रौ ०८ वाजून ५० मिनिटे
सांगली……. रात्रौ ०९ वाजून ०० मिनिटे
सोलापूर……. रात्रौ ०८ वाजून ५३ मिनिटे
नागपूर……….. रात्रौ ०८ वाजून ३१ मिनिटे
अमरावती……. रात्रौ ०८ वाजून ३७ मिनिटे
अकोला…….. रात्रौ ०८ वाजून ४१ मिनिटे
औरंगाबाद……. रात्रौ ०८ वाजून ५० मिनिटे
Today Is Margashirsha Sankashta Chaturthi Time and Puja Details