मुंबई – एकेकाळी प्रचंड स्पर्धा असताना प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हीने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक अभिनेत्रींना मागे टाकत बॉलिवूड मध्ये आपले स्थान निर्माण केले होते. अभिनेत्री काजोल हिचा दि. ५ ऑगस्ट रोजी वाढदिवस असून करिअरच्या शिखरावर असताना तिने लग्न केले, मात्र त्यानंतरही सिने चाहत्यांच्या हृदयात काजोलबद्दलचे प्रेम कमी झालेले नाही. अद्यापही काजोलची गणना हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींमध्ये केली जाते.
शाहरुख खान आणि काजोल यांची जोडी आजही सिनेमा प्रेमींच्या सर्वात आवडत्या जोड्यांपैकी एक आहे. कारण या दोघांनी बॉलिवूडमध्ये एकत्र अनेक उत्तम चित्रपट केले आहेत. वाढदिवसाच्या खास निमित्ताने आज आपण काजोलशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
काजोल ही बॉलिवूडचे ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक शोमू मुखर्जी आणि अभिनेत्री तनुजा यांची मुलगी आहे. काजोलची धाकटी बहीण तनिषा देखील अभिनेत्री आहे. मात्र तनिषा तिच्या बहिणी आणि आईपेक्षा मोठे स्थान मिळवू शकली नाही. काजोल लहानपणापासूनच जिद्दी असून एकदा तिने जे करायचे ठरवले ते कोणत्याही परिस्थितीत करतेच. म्हणूनच ती आपला मुद्दा मांडण्यासाठी आपल्या पालकांशी वाद घालत असे. असा खुलासा काजोलने स्वतः एका मुलाखतीत केला होता.
काजोलने १९९२ मध्ये बेखुदी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. त्यानंतर, काजोलने एकापेक्षा एक सरस अशा बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनय करत मोठ्या पडद्यावर आपला ठसा निर्माण केला. चित्रपट क्षेत्रातील आपल्या प्रवासात काजोलने बाजीगर, करण अर्जुन, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, गुप्त, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, दिलवाले आणि तान्हाजी या चित्रपटांसह अनेक चित्रपटात काम करत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त काजोलने प्रभुदेवा आणि अरविंद स्वामी यांच्यासोबत ‘मिनसारा कन्नवू’ या तामिळ चित्रपटात काम केले. काजोलला चित्रपटातील विशेष योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यातच दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे हा चित्रपट केवळ शाहरुख-काजोल साठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतीलही एक उत्तम चित्रपट ठरला आहे.
याशिवाय, काजोलला ‘कुछ कुछ होता’, कभी खुशी कभी गम, फना, माय नेम इज खान या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. काजोलचा गुप्त चित्रपट १९९७ साली रिलीज झाला होता. या चित्रपटातील त्याचे पात्र नकारात्मक होते. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट खलनायक पुरस्कार मिळाला. एवढेच नाही तर काजोलला २०११ मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
चित्रपटांव्यतिरिक्त काजोल तिच्या वैयक्तिक आयुष्यातही खूप चर्चेत राहीली आहे. कारण अभिनेता अजय देवगणसोबत दीर्घ प्रेम प्रकरणानंतर तिने १९९९ मध्ये अजयशी लग्न केले. अजय देवगण आणि काजोल यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वोत्तम जोडींपैकी एक असल्याचे म्हटले जाते. या दोन्ही अभिनेत्यांना एक मुलगी (न्यासा) आणि मुलगा (युग ) आहेत. विशेष म्हणजे काजोलचा मेणाचा पुतळा मादाम तुसाद सिंगापूर येथेही बसवण्यात आला आहे.