इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय असलेला कार्यक्रम म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. हा कार्यक्रम पूर्वी जेवढा लोकप्रिय होता, तेवढा आज आहे की नाही, हा संशोधनाचा मुद्दा असू शकतो पण सध्या सातत्याने हा कार्यक्रम वादात अडकलेला आहे, यावर सर्वांचेच एकमत आहे. आता पुन्हा एकदा हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी या कार्यक्रमाचे निर्माते, दिग्दर्शकांवर आरोप केले होते. आता यात बावरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मोनिका भदोरियाने देखील आरोप केले आहेत.
निर्मात्यांवर टीका
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी, प्रोडक्शन हेड सोहेल रमानी काही दिवसांपासून मोठ्या वादात सापडले आहेत. मोनिका भदोरियाने सेटवर काम करताना आलेल्या अडचणींचा खुलासा एका मुलाखतीत केला आहे. २०१५ पासून अभिनेत्री दिशा वाकानी शोमध्ये का येत नाही यावरही मोनिकाने भाष्य केले आहे. “मालिकेच्या सेटवर सर्व कलाकारांना सोहेल रमानीने सर्वाधिक त्रास दिला आहे. त्याने एकदा सेटवरच्या खुर्च्या सुद्धा फेकून दिल्या होत्या, तो सर्वांशी उद्धटपणे वागतो आणि बहुतांश कलाकारांशी त्याचे भांडण झाले आहे. एवढी भांडणे होऊनही सोहेल अजून प्रोडक्शन हेड आहे, तर सर्व कलाकार शो सोडून जात आहेत.
असित मोदींवरही टीका
‘तारक मेहता…’ मालिकेच्या सेटवर अभिनेत्री दिशा वाकानी म्हणजेच दया बेनला सुद्धा अशीच वागणूक मिळाली का? या प्रश्नावर मोनिका म्हणाली, असे असू शकते. तुम्हाला कोणीतरी जास्त मानधन देत आहे आणि पुन्हा मालिकेत ये म्हणून विनंती करत आहे. असे असताना न येण्यामागे याच्याशिवाय दुसरे काय कारण असू शकते?” असा प्रश्न मोनिकाने केला आहे. तर असित मोदी हे कलाकारांना नाही तर त्यांच्या टीमला सपोर्ट करतात. असा दावा मोनिका भदोरियाने केला आहे.
वादांनी घेरलेला शो
या शोबाबत अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. लैंगिक छळाच्या आरोपाशिवाय कलाकारांना फी न देण्यावरूनही यापूर्वी वाद झाल्याचा प्रकार समोर आला होता.
TMKOC TV Show Actress Monika Bhadoriya Producer