इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील मालिका हे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे अत्यंत उत्तम साधन असते. त्यामुळेच या मालिकांना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम. मध्यंतरी या मालिकेत होणारे बदल पाहता, ही मालिका चर्चेत आली होती. आता पुन्हा या मालिकेत एक नवे वळण येऊ घातले आहे. त्यामुळे पुन्हा ही मालिका चर्चेत आली आहे. या मालिकेला लवकरच १५ वर्षे पूर्ण होणार आहेत. छोट्या पडद्यावर सर्वाधिक काळ सुरू असलेली ही लोकप्रिय मालिका आहे.
काय येणार ट्विस्ट?
या मालिकेचे प्रेक्षक अनेक वर्षांपासून मालिकेत टप्पू सोनूला केव्हा मागणी घालणार? याची आतुरतेने वाट पाहत होते. आता लवकरच टप्पू आणि सोनूची प्रेमकहाणी लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. टप्पू आणि सोनूमधला रोमान्स आता चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. गोकुळधाम सोसायटीचे सचिव आत्माराम तुकाराम भिडे यांचे दुःस्वप्न सत्यात उतरणार आहे. त्याची एकुलती एक मुलगी सोनू तिच्या बालपणीचा मित्र टप्पूच्या प्रेमात पडली आहे. भिडे सोनूला टप्पूपासून दूर ठेवण्याचा खूप प्रयत्न करतात पण त्यांची सगळी मेहनत फुकट गेल्याचे दिसते आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
तारक मेहताच्या इन्स्टाग्राम अधिकृत पेजने या मालिकेच्या आगामी भागाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात टप्पू त्याच्या आवडत्या सोनूला लाल गुलाब देऊन त्याच्या मनातील गोष्ट सांगताना दिसतो आहे. या प्रोमोमध्ये टप्पू हातात गुलाब घेऊन सोनूला प्रपोझ करत असतो, तेवढ्यात सोनूचे वडील भिडे गुरुजी तिथे येतात आणि टप्पूच्या हातातून गुलाब हिसकावून घेतात. गंमत म्हणजे, भिडे थेट जेठालालच्या घरी पोहोचतात आणि घडलेल्या घटनेची माहिती बापूजी आणि जेठालाल या दोघांना देतात. आत्मारामचे बोलणे ऐकून बापूजी आणि जेठालाल यांना धक्काच बसतो. तर जेठालाल टप्पूला म्हणतो, “तू आमच्यासमोर सोनूला हवे तेवढे गुलाब दे.” यानंतर भिडे गुरुजी आणि जेठालालमधील वाद या प्रोमोमध्ये दाखवण्यात आला आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. अनेक यूजर्सना असे वाटते की, दरवेळेप्रमाणे या वेळीही भिडे गुरुजी स्वप्न बघत असणार, तर काहींचे म्हणणे आहे की, शोचा घसरलेला टीआरपी पाहता निर्मात्यांनी हा ट्विस्ट आणला आहे.
१५ वर्षे लोकप्रियतेच्या शिखरावर
तारक मेहता का उल्टा चष्मा सुरू होऊन १५ वर्ष पूर्ण होत आहेत. ही टीव्हीवर सर्वात जास्त काळ चालणाऱ्या मालिकांपैकी एक आहे. काही वर्षांपासून तारक मेहताच्या काही सीनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, त्यातील एक सीन आता पूर्ण होताना चाहत्यांना दिसणार आहे. ही मालिका सुरू होऊन १५ वर्षे पूर्ण होत आहेत. काही मोजक्या आवडत्या मालिकांमध्ये ही मालिका आवर्जून येते. विशेष म्हणजे टीव्हीवर सर्वात जास्त काळ चालणाऱ्या मालिकांपैकी ही एक असली तरी त्याच्या टीआरपीमध्ये अजिबात फरक पडलेला नाही. आजही टॉप ५ च्या शर्यतीत ही मालिका हमखास दिसते.
TMKOC TV Serial New Twist Bhide Life Video