मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तारक मेहता का उलटा चश्मा ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर राज्य करते आहे. सध्या या मालिकेची चर्चा त्यातील तारक मेहता या व्यक्तिरेखेमुळे चर्चेत आली आहे. कारण तारक मेहता म्हणजेच शैलेश लोढा ही मालिका आता सोडणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या एका दिवसाच्या कमाईवरदेखील चर्चा रंगली आहे.
शैलेश लोढा हे मालिकेच्या निर्मात्यांवर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांनी शूटिंगला जाणेही बंद केले आहे. या नाराजीमागचे कारण फी आहे की आणखी काही यावर देखील तर्क वितर्क लावले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार शैलेश लोढा तारक मेहता या व्यक्तिरेखेसाठी प्रत्येक एपिसोडचे एक लाख रुपयांपर्यंत फी घेतात. तसेच ते इतर कार्यक्रमांमधूनही लाखो रुपयांची कमाई करतात. त्यांची संपत्ती एकूण तीन कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. ते पत्नी स्वाती आणि मुलगी स्वरासोबत मुंबई येथे वास्तव्यात आहेत. लोढा यांची जीवनशैलीदेखील उच्च प्रतीची आहे. त्यांच्याकडे ऑडी, मर्सिडिज बेन्झ ई३५०डी सारख्या लक्झरी महागड्या गाड्यादेखील आहेत.
मालिकेत शैलेश कवी दाखवले आहेत. ते खऱ्या आयुष्यातदेखील कवी आणि लेखक आहेत. अभिनय आणि कवी असा कलात्मक संगम असलेल्या या व्यक्तीमत्वाचा चाहतावर्गही मोठा आहे. सोशल मीडियावरदेखील ते सक्रिय असून तिथेदेखील स्वलिखित कविता ते टाकत असतात. तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेत त्यांची एन्ट्री कशी झाली यामागेदेखील एक गंमतीशीर किस्सा आहे. शैलेश हे वाह क्या बात है या नावाने कवी संमेलन घ्यायचे. या कार्यक्रमात तारक मेहता मालिकेचे निर्माते असित कुमार मोदीदेखील आले होते. या कार्यक्रमातच असित यांनी तारक मेहता व्यक्तिरेखेची ऑफर शैलेश यांना दिली. त्यांनी ती लगेच स्वीकारली आणि वर्षानुवर्षाचा हा प्रवास त्यांनी सुरु केला.