मुंबई (इंडिया दर्पण वृतसेवा) – छोटा पडदा म्हणजेच टीव्हीवरील अनेक मालिका लोकप्रिय होतात. परंतु ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने लोकप्रियतेचे अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा खूप लोकप्रिय टीव्ही शो आहे. सन 2008 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने आतापर्यंत रसिक प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील काही कलाकारांनी यापुर्वी हा शो सोडला आहे. त्यात दिशा वाकानी, नेहा मेहता, गुरचरण सिंग या कलाकारांचा समावेश आहे. आता मात्र एक धक्कादायक बाब समोर येत आहे. ती म्हणजे मालिकेतील जेठालालचे फायर ब्रिगेड तथा जिवलग मित्र तारक मेहताची भूमिका करणारा शैलेश लोढा हा शो सोडत आहेत.
तारक मेहता का उल्टा चष्मा या टीव्ही शोची लोकप्रियता लहानांपासून मोठ्यांपर्यंत आहे. लोकांना त्यातील व्यक्तिरेखा खूप आवडतात. जेव्हा जेव्हा एखाद्या अभिनेत्याचा शो सोडल्याची बातमी येते तेव्हा प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरते. आता शैलेश लोढा म्हणजेच तारकने शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या शो संबंधित एका सूत्राने सांगितले की, शैलेश लोढा एक महिन्यापासून या शोचे शूटिंग करत नाहीयेत. तसेच शोमध्ये परतण्याचाही त्यांचा कोणताही विचार नाही.
शैलेश करारावर खूश नसल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या तारखांचा योग्य वापर होत असल्याचे त्यांना वाटते. त्याचवेळी, असे देखील बोलले जात आहे की ते या शोमुळे इतर काही प्रयत्न करू शकत नाहीत. त्यांना अनेक ऑफर्स आल्या, मात्र, या शोमुळे त्या नाकाराव्या लागल्या. शैलेश लोढा हे कवी, अभिनेता, विनोदकार आणि लेखक आहेत. यापूर्वी ते कपिल शर्माच्या शोमध्येही दिसले होते. शैलेश रामायणातील सीता म्हणजे दीपिका चिखलियासोबतही दिसले होते.