मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रसिद्ध टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आपल्या प्रेरणादायी विचारांसाठी, मनोरंजनासाठी आणि सामाजिक समस्या मांडण्यासाठी हा शो नेहमीच चर्चेत असतो, तर गेल्या अनेक दिवसांपासून असित कुमार मोदी आणि जेनिफर मिस्त्री यांच्यातील वादामुळे तो चर्चेत आहे. जेनिफर हिने मालिकेत रोशनसिंग सोढी हिची भूमिका केली आहे. जेनिफरने केलेल्या शारीरिक शोषणाच्या आरोपानंतर आता निर्माता असित कुमार मोदी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जेनिफरने केलेल्या तक्रारीच्या आधारे मोदी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचे निर्माता असित कुमार मोदी आणि ऑपरेशन्स हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पवई पोलिसांनी असित कुमार मोदी विरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) कलम 354 आणि 509 (महिलेवर हल्ला करणे किंवा तिच्या विनयभंगाच्या उद्देशाने गुन्हेगारी बळजबरी करणे) अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असित कुमार मोदी आणि इतर दोन क्रू सदस्यांविरुद्ध लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी पवई पोलिसांनी अभिनेत्रीचे जबाब नोंदवले. पोलिस लवकरच असित कुमार मोदी यांना बयाण नोंदवण्यासाठी समन्स बजावणार आहेत. मात्र, असित मोदी, सोहेल आणि जतीन यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. असित मोदी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘ती माझी आणि शो दोघांचीही बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याने आम्ही कायदेशीर कारवाई करू. कारण तिला आम्ही काढून टाकले आहे, त्यामुळे ती बिनबुडाचे आरोप करत आहे.
लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने काही दिवसांपूर्वी शो सोडला होता. १५ वर्षांनंतर शोमधून बाहेर पडल्यानंतर तिने शोचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर मानसिक आणि लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले. तिने निर्माते मोदी, ऑपरेशन्स हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माते जतिन बजाज यांच्याविरुद्ध कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ झाल्याची तक्रार दाखल केली आहे.