इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. मालिकेचे कथानक आणि कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. यामुळेच इतकी वर्ष झाली तरी आजही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या या मालिकेतील अनेक कलाकार मालिकेतून बाहेर पडत असल्याने या मालिकेबाबत चर्चा सुरू आहे.
आजवर बऱ्याच कलाकारांनी या मालिकेचा निरोप घेतला. नुकतीच यामध्ये नव्या टप्पूची एण्ट्री झाली आहे. अभिनेता नितीश भलूनी याने मालिकेत राज अनाडकतची जागा घेतली आहे. ‘तारक मेहता’मध्ये जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी नितीशसोबत मिळून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दिलीप यांनी दयाबेनचीही आठवण काढली.
दिलीप जोशी आणि नितीश यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पत्रकारांनी दिलीप यांना दयाबेनविषयी प्रश्न विचारला. दयाबेन परत कधी येणार, अशी विचारणा जेठालाल यांना यावेळी करण्यात आली. त्यावर दिलीप जोशी म्हणाले की, “हे निर्मात्यांवर अवलंबून आहे. मालिकेत नवीन अभिनेत्री आणायची की नाही, याचा निर्णय तेच घेतील. एक कलाकार म्हणून मला दयाच्या भूमिकेची खूप आठवण येते. जेव्हापासून दिशा या मालिकेतून निघून गेली, तेव्हापासून तो भाग, तो अँगल, ती मजामस्ती जणू नाहीशी झाली आहे. मी तर नेहमीच सकारात्मक विचार करतो. असित भाईसुद्धा नेहमी सकारात्मक असतात. त्यामुळे कधी काय होईल हे सांगता येत नाही.”
नितीश यांनीही दिलीप जोशी यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक असल्याची प्रतिक्रिया दिली. “भूमिकेत कसं राहायचं आणि भूमिकेत राहून कसं जगायचं, हे त्यांच्याकडून शिकायचं. यामुळेच जेव्हा सरांचे सीन सुरू असतात, तेव्हा मी कॅमेऱ्याजवळ बसून त्यांचं काम पाहतो”, असं तो म्हणाला.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी हिने २०१७ मध्ये मालिका सोडली. बाळंतपणासाठी तिने काही दिवस सुट्टी घेतली होती, नंतर मात्र ती मालिकेत परतलीच नाही. दयाबेनला मालिका सोडून पाच वर्षे झाली तरी या मालिकेत अजूनही नवीन अभिनेत्रीची नियुक्ती झालेली नाही. दिशाला मालिकेत परत आणण्यासाठी निर्माते-दिग्दर्शकांनी अनेक प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश मिळालं नाही.
TMKOC Jethalal Dilip Joshi on Daya Disha Vakani