इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हे विनोदी कार्यक्रम हे छोट्या पडद्यावरील रसिकांचे स्ट्रेस बस्टर असतात. या मालिका पाहताना प्रेक्षक यात रमतात आणि पोट धरून हसतात. गेली १४ वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आता जुने भाग बघण्याचीही सोय असल्याने मोबाइलवरसुद्धा या मालिकेचे भाग प्रेक्षक शोधून शोधून पाहतात. कायम सर्वांना हसवणारी ही मालिका आता स्वतः आलबेल नसल्याचे चित्र आहे. एखादा कलाकार चित्रपट सोडून जातो, त्याची चर्चा सगळीकडे होते. असेच काहीसे टीव्ही विश्वातही घडते.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील काही कलाकारांनी ही मालिका सोडली होती. आता या मालिकेत सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडली तेव्हा मात्र प्रेक्षकांना धक्का बसला आहे. एकेक करून ज्या पात्रांना त्या भूमिकेत पाहायची प्रेक्षकांना सवय होती त्यात बदल होत असल्याने प्रेक्षक देखील थोडे नाराज असल्याचे दिसत आहेत.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेले जेठालाल आणि दयाबेन सोडले तर अन्य काही पात्रांसोबत शैलेश लोढा हे एक उत्तम कलाकार होते. शैलेश लोढा यांना मालिकेतून प्रेक्षकांची पसंती मिळत होती. त्याच्या खुमासदार सुत्रसंचालनामुळे अनेकजण हा कार्यक्रम बघत होते. मात्र, लोढा यांनी मालिका सोडली यापेक्षाही धक्कादायक आहे ते, मालिका सोडल्यापासून त्यांचे मानधन रखडले आहे हे. मिळालेल्या माहितीनुसार शैलेश लोढा यांना मालिका सोडल्यापासून त्यांचे मानधन मिळालेले नाही. एका रिपोर्टनुसार शैलेश लोढा यांना वर्षभरापासून पैसे दिले गेले नाहीत. मालिकेच्या निर्मात्यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी एप्रिल २०२२ मध्ये मालिका सोडली होती.
सिद्धार्थ कननच्या कार्यक्रमात शैलेश लोढा यांनी मालिका सोडण्याचे कारण सांगितले. ‘गेली १४ वर्ष मी मालिकेत होतो. या मालिकेला माझ्या आयुष्यात आणि करिअरमध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. मी रोज सेटवर जायचो, काम करायचो. मी तसा कोणाची वाट बघणारा नाही मात्र या मालिकेसाठी मी वाट बघितली. माझा नाईलाज होता. त्यामुळे मी ही मालिका सोडली. ही मालिका सोडण्याचे कारण मी स्वतः एक दिवस सांगणार आहे. मी फक्त योग्य वेळेची वाट बघत आहे’. शैलेश आणि या मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांच्यामध्ये वाद झाल्याने त्यांनी काम करण्यास नकार दिला अशीही चर्चा तेव्हा रंगली होती.
शैलेश लोढा मालिकेतून बाहेर पडल्यावर त्यांच्या जागी अभिनेता सचिन श्रॉफ ही भूमिका साकारत आहे. शैलेश लोढा अभिनयासह लेखनदेखील करतात. त्यांना कविता करायचा छंद आहे. त्यांचे कविता वाचनाचे कार्यक्रम वर्षभर सुरू असतात. शैलेश लोढा मूळचे जयपूरचे आहेत. या मालिकेसाठी त्यांनी मुंबई गाठली होती.
TMKOC Famous TV Show Actor Not Get Payment
Shailesh Lodha