मुंबई – टीव्ही वरील हिंदी मालिका तारक मेहता का उलटा चष्मा या घराघरातील लोकप्रिय मालिकेतील नट्टू काकाची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते घनश्याम नायक यांचे आज निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते कर्करोगाशी मुकाबला करत होते. अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली.
मालिकेत नट्टू काका यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व अनेकदा त्यांचे दुकान मालक जेठालाल यांची विकेट घेत असे. काही आठवड्यांपासून नट्टू काका हे तारक मेहता मालिकेत दिसत नव्हते. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये शंका निर्माण झाली होती. दया भाभी नंतर आता नट्टू यांनी ही मालिका सोडली का, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आले.
७६ वर्षीय घनश्याम नायक सध्या कर्करोगाशी लढा देत होते. हा आजार झाला असल्याचे गेल्या महिन्यांपूर्वीच त्यांना समजले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. घनश्याम नायक यांचा मुलगा विकास याने तसे सांगितले होते. घनश्याम नायक यांच्या गळ्या लगत काही डाग दिसले. त्यानंतर ते डॉक्टरकडे गेले. काही चाचण्या करुन पुढील उपचार सुरू करण्यात आले. गळ्याचे ऑपरेशन करण्यात आले. एकूण ८ गाठी काढून टाकण्यात आल्या. या कारणास्तव नट्टू काका यांनी मालिकेतून ब्रेक घेतला होता.
एका मुलाखती दरम्यान ‘नट्टू काका’ यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना सांगितले होते की, गेल्या अनेक दिवसांपासून मी कर्करोगावर उपचार घेत आहे. आशा आहे की, लवकरच सर्व काही ठीक होईल. जर मुंबईत लवकरच शुटींग सुरू झाले तर मी पुन्हा कामावर परत येईल. यासाठी मी उत्साही आहे. जर मला तारक मेहता का उल्टा चष्माच्या पुढच्या एपिसोडमध्ये काम मिळाले तर ही माझ्यासाठी एक अतिशय विशेष गोष्ट आहे. मला खात्री आहे की, लोकांना माझे काम नेहमीप्रमाणे आवडेल. सध्या महिन्यातून एकदा माझी केमोथेरपी केली जाते. त्यामुळे डॉक्टर म्हणतात की, मी काम करू शकतो आणि त्यात कोणतीही अडचण नाही. सकारात्मकतेच्या भावनांमुळे मला नेहमीपेक्षा बरे वाटते. लवकरच मी पूर्णपणे ठीक आणि निरोगी होईल, असा आशावाद नायक यांनी व्यक्त केला होता. मात्र, आता त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांची नट्टू काकाची भूमिका चाहत्यांच्या स्मरणात राहणार आहे.
https://twitter.com/AsitKumarrModi/status/1444649126830870529