इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तारक मेहता का उल्टा चष्मा या अतिशय लोकप्रिय टीव्ही मालिकेतील ख्यातनाम पात्र दया बेन अर्थात दिशा वाकाणी हिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. २०१७ मध्ये तिने मुलीला जन्म दिला होता. आता तिने मुलाला जन्म दिला आहे.
तारक मेहता उल्टा चष्मा या शोमध्ये दया बेन या तिच्या पात्राने सर्वांची मने जिंकणाऱ्या दिशा वकानीला चाहते खूप दिवसांपासून मिस करीत आहेत. २०१७ मध्ये दिशा ही मुलीची आई झाली होती. त्यादरम्यान दिशा प्रसूती रजेवर गेली होती. मुलीच्या जन्मानंतर काही दिवसांनी दिशा शोमध्ये परतेल असे सर्वांना वाटत होते, पण तसे झाले नाही. इतकेच नाही तर दिशा अद्यापही शोमध्ये परतलेली नाही. तर, तिच्याऐवजी शोमध्ये दुसरीच अभिनेत्री परतेल, अशाही चर्चा रंगल्या. आता पुन्हा दिशा ही शोमध्ये परतेन अशा बातम्या रंगल्या आहेत.
ई टाइम्सच्या रिपोर्टनुसार, दिशा यावेळी बाळाची आई झाली आहे. काही दिवसांपूर्वी तिने एका मुलाला जन्म दिला. तिचा पती आणि उद्योगपती मयूर पंड्या आणि तिचा भाऊ अभिनेता मयूर वाकाणी यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
2021 मध्ये, दिशा तिच्या पतीसोबत एका फॅमिली फंक्शनमध्ये स्पॉट झाली होती आणि त्यावेळी अभिनेत्रीचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत होता. शोमध्ये सुंदर लालची भूमिका साकारणारा दिशाचा भाऊ मयूर म्हणाला, “मी पुन्हा मामा बनलो याचा मला खूप आनंद आहे. 2017 मध्ये, दिशाच्या मुलीचा जन्म झाला आणि आता एक मुलगा आहे. मी खूप आनंदी आहे.’
शोचे निर्माते असित मोदी यांनी दया बेनच्या पात्राच्या पुनरागमनाबद्दल नुकतेच सांगितले की, ‘आम्ही शोमध्ये तिचा ट्रॅक पुन्हा दाखवण्याची पूर्ण योजना केली आहे. दिशा ही दया बेनच्या भूमिकेत येईल हे मला माहीत नाही. दिशा बेन असो किंवा निशा बेन, आम्ही शोमध्ये दया यांचे पात्र नक्कीच आणू.
दिशाचा भाऊ म्हणाला, ‘दिशा शोमध्ये नक्कीच परतेल. याला बराच काळ लोटला आहे आणि तारक मेहता हा एकमेव शो आहे जिथे दिशाने इतकी वर्षे काम केले. त्यामुळे दिशा शोमध्ये परत न येण्याचे कारण नाही. ती कधी परत येईल, याची आम्ही वाट पाहत आहोत.
दिशा अखेर शोमध्ये कधी एन्ट्री करते, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. यावेळी निर्मात्यांनी दया बेनला शोमध्ये परत आणणे आवश्यक आहे कारण हळूहळू अनेक कलाकार शो सोडत आहेत. अलीकडेच शोमध्ये तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढाने शो सोडल्याची बातमी समोर आली आहे. तर, बबिताची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ताही शो सोडणार असल्याच्या चर्चा आहेत.