इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील अनेक मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या असतात. इतक्या की त्या पाहण्यासाठी, त्यांच्या वेळेनुसार सगळ्या ऍडजस्टमेंट केली जाते. अशीच एक मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. जवळपास १० – १५ वर्षे ही मालिका सुरू आहे, आणि लोकप्रिय देखील आहे. त्यातील सगळीच पात्रे लोकांना चांगलीच भावतात. अशी ही लोकप्रिय मालिका काही काळापासून मात्र वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मालिकेतील अनेक कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला आहे, तर काही अभिनेत्रींनी निर्मात्यावर गंभीर आरोप करत मालिकेतून एक्झिट घेतली आहे. आतापर्यंत या आरोपांवर निर्माते किंवा अन्य कोणाकडून काहीच स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. आता या मालिकेचे ऑपरेशन्स हेड सोहेल रमाणी यांनी आपल्यावर आरोप करणाऱ्या अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवाल हिला प्रश्न विचारले आहेत.
जेनिफरनेच केला असित मोदींना मेसेज
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत मिसेस सोढी ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवाल हिने मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यासह मालिकेचे कार्यकारी निर्माते जतीन बजाज आणि ऑपरेशन्स हेड सोहेल रमाणी यांच्याविरोधात तक्रार केली होती. आता याप्रकरणी सोहेल रमाणी यांनी खुलासा केला आहे. सोहेल रमाणी म्हणतात, ‘जर जेनिफरला मालिका आणि निर्मात्यांचा इतका त्रास होत होता तर २०१६ मध्ये ती मालिकेत पुन्हा परत का आली. मालिकेत पुन्हा येण्यासाठी तिला कोणी जबरदस्ती केली नव्हती. उलट जेनिफरनेच असित मोदी यांना आपण सुधारली असून, एक संधी देण्यात यावी असा मेसेज केला होता, असा खळबळजनक खुलासा रमाणी यांनी केला आहे.
हा तर जेनिफरचा पब्लिसिटी स्टंट
जेनिफर हिने जे काही केलं तो एक पब्लिसिटी स्टंट असल्याचे रमाणी यांचे म्हणणे आहे. आमच्या विरोधात तक्रार दाखल झाल्याची माहिती पोलिसांकडून आमच्यापर्यंत अली नसल्याचे रमाणी याने स्पष्ट केले आहे.