नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पश्चिम बंगालमधील सर्वात शक्तीशाली राजकीय पक्ष समजल्या जाणाऱ्या तृणमुल काँग्रेसचे साकेत गोखले यांची नुकतीच राज्यसभेवर निवड झाली आहे. साकेत यांच्या नियुक्तीपेक्षा त्यांच्या आजवरच्या प्रवासाची कहाणी मोठी रंजक राहीली आहे. मुख्य म्हणजे त्यांचा हा प्रवास महाराष्ट्रातून सुरू झाल्याची माहिती पुढे आली आहे.
नुकत्याच पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या ११ जागांवरील उमेदवार निवडण्यात आले, यात नाशिकचे साकेत गोखले हे देखील राज्यसभेवर तृणमूल काँग्रेस पक्षाकडून निवडून आले आहेत. त्यामुळे गोखले यांचे बालपण गेलेल्या नाशिकच्या घरी आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या ११ जागांवरील उमेदवारांमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, डोला सेन, साकेत गोखले यांचा समावेश आहे. यातील मूळ महाराष्ट्रीयन असलेल्या साकेत गोखले यांच्या निवडीचा आनंद नाशिकच्या पंचवटीत राहणारे त्यांचे वडील सुहास गोखले यांनी साजरा केला आहे.
राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून पाडला प्रभाव
साकेत गोखले हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. तत्पूर्वी ते ठाणे येथे माहीती आधिकार कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांना तृणमुल कॉग्रेसने पक्षात काम करण्याची संधी दिली. झोकून देउन काम केल्याच्या बदल्यात यंदा तृणमृल कॉग्रेसने त्यांच्या कोट्यातून साकेत गोखले यांना राज्यसभेवर पाठविले. साकेत यांच्या निवडीसोबत नाशिकला आणखी एक खासदार राज्यसभेत पोहोचल्याचा इतिहास झाला.
वडील राजकारणापासून दूर
साकेत गोखले यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. त्यांचे वडील सुहास गोखले हे कायम राजकारणापासून दूर राहीलेत. मात्र, मुलगा खासदार झाल्याचा त्यांना प्रचंड आनंद आहे. गोखले कुटुंबीय हे मूळ नाशिकचे असून पंचवटी भागातील कपालेश्वर मंदीरामागे खांदवे सभागृहाजवळ त्यांचे घर आहे. साकेत गोखल यांचे आजी आजोबा हे दोघेही नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या जु. स. रुंग्ठा विद्यालयात शिक्षक होते. साकेत यांचे शिक्षण मुंबईत विल्सन कॉलेजला झाले. तेथेच माहिती आधिकार कार्यकर्ते म्हणून ते नावारुपाला आले.