नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तिस-या श्रावणी सोमवारी तर लाखो शिवभक्त त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी तसेच फेरीकरिता जात असतात. या भाविकांची कोणतीही गैरसोय होवू नये याकरीता एसटी महामंडळ व नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थातच सिटीलिंकच्या वतीने जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
सिटी लिंक बस
रविवार दिनांक १८ ऑगस्ट व सोमवार दिनांक १९ ऑगस्ट २०२४ असे सलग दोन दिवस या जादा बसेस सोडण्यात येणार आहे. सद्यस्थितीत नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर मार्गे निमाणी या मार्गावर एकूण ३० बसेस सोडण्यात येतात. त्यानुसार या ३० बसेसच्या माध्यमातून नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर १०० फेर्या तर त्र्यंबकेश्वर ते नाशिकरोड १०० फेर्या अशा एकूण २०० फेर्या नियमित चालविण्यात येतात.
या नियमित फेर्यांव्यतिरिक्त रविवार दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी ५० जादा बसेस सोडण्यात येणार आहे. यामध्ये निमाणी ते त्र्यंबकेश्वर एकूण ३० बसेस तर नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर एकूण २० बसेस जादा सोडण्यात येणार आहे. एकूणच रविवारी नियमित ३० तसेच जादा ५० अशा एकूण ८० बसेस त्र्यंबकेश्वर करीता मार्गस्थ करण्यात येतील. तर सोमवार दिनांक १९ ऑगस्ट २०२४ रोजी एकूण २९ जादा बसेस सोडण्यात येणार आहे. यामध्ये निमाणी ते त्र्यंबकेश्वर १७ बसेस तर नाशिकरोड ते त्र्यंबकेश्वर १२ बसेस अशा एकूण २९ जादा बसेस सोडण्यात येणार आहे. एकूणच सोमवारी नियमित ३० तसेच जादा २९ अशा एकूण ५९ बसेस त्र्यंबकेश्वर करीता भाविकांच्या सेवेकरिता मार्गस्थ होतील.
एसटी महामंडळाच्या २७० बसेस
श्रावण महिन्यातील तिसरा श्रावणी सोमवार दिनांक १९.०८.२०२४ रोजी असल्याने सदर दिवशी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मोठया प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. तिसरा श्रावणी सोमवार [रविवार/सोमवार] म्हणजे दिनांक १८.०८.२०२४ ते दिनांक १९.०८.२०२४ या कालावधीत वाहतुक सुरळीत व्हावी म्हणुन दिनांक १८.०८.२०२४ रोजी सकाळी ०८.०० ते दिनांक १९.०८.२०२४ रोजीच्या पुढील आदेशा पर्यंत नाशिक विभागामार्फत खालील वाहनतळ व नाशिक येथील नविन सिबीएस (ठक्कर) येथे खालील प्रमाणे बसेसचे नियोजन केलेले आहे.
नाशिक ते त्र्यंबक – १९०
अंबोली ते त्र्यंबक – १०
पहिने ते त्र्यंबक – १०
घोटी ते त्र्यंबक- १०
खंबाळे ते त्र्यंबक – ५०
एकुण – २७०