इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तिरुपती येथे भाविकांसाठी ९८ कोटी रुपयांचे बहुउद्देशीय संकुल उभारण्यात येणार आहे. संबंधित प्रस्तावाचे तिरुमला तिरुपती देवस्थान विश्वस्तांनी पुनरुज्जीवन केले आहे. त्यामुळे भाविकांना अनेक सुविधा मिळू शकणार आहेत. गोवर्धन चौथऱ्याच्या मागे हे पाच मजली भव्य संकुल २ लाख १४ हजार ७५२ चौरस फूट क्षेत्रफळात उभारण्यात येणार आहे.
या संकुलाचा प्रस्ताव २०१८ मध्ये विश्वस्त मंडळापुढे ठेवण्यात आला होता. तेव्हा ७९ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली होती. तेव्हा हे संकुल बाह्य वळण रस्त्याजवळ होणार होते, परंतु तेथील झाडे तोडण्यास परवानगी मिळणे कठीण असल्याचे मंदिर प्रशासनाच्या लवकरच लक्षात आले. त्यामुळे गोवर्धन चौथऱ्यामागे हे संकुल होणार आहे. कोरोना महामारीमुळे संकुलाचा हा प्रस्ताव रखडला होता. परंतु, आता दररोज एक लाखापेक्षा जास्त भाविक तिरुपती बालाजीला भेट देत आहेत. त्यामुळे मंदिर व्यवस्थापनाने या प्रस्तावावर पुनर्विचार केला.
या भव्य संकुलात १४ शयनकक्ष असतील. त्यात सुमारे १७०० भाविकांची निवासव्यवस्था होऊ शकणार आहे. याशिवाय मुंडनासाठी दोन कक्ष, ४०० भाविक एकाच वेळी भोजन करू शकतील असा कक्ष, लॉकर व्यवस्था, १८० विश्रांती कक्ष, गिझरसह १६० स्वच्छतागृहे, चारचाकी वाहनांसाठी ९७ पार्किंग अशी सर्व सुविधा असणार आहे.
Tirupati Multi Purpose Complex Facilities