इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या सुमारे दोन ते तीन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे देशभरातील मठ, मंदिरे आणि धार्मिक स्थळे बंद होती. परंतु गेल्या चार महिन्यांपासून पुन्हा एकदा सर्व धार्मिक स्थळे खुली झाल्याने सर्वत्र मंदिरांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. त्यातच सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने गर्दीत प्रचंड वाढ झाली आहे. विशेषतः चारधाम यात्रा असो की शिर्डीचे साईबाबा मंदिर किंवा तिरुपती येथील बालाजी मंदिर सर्व ठिकाणी भाविकांची अफाट गर्दी दिसून येत आहे. आताही तिरुपतीला भाविकांची प्रचंड गर्दी असून दर्शनासाठी भाविकांना ४८ तासांपेक्षा अधिक कालावधी लागत आहे.
आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील तिरुमला मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. भगवान व्यंकटेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांना ४८ तासांपेक्षा जास्त वेळ थांबावे लागते. यावरून गर्दीचा अंदाज लावता येतो. मंदिर व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी एक लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. रविवारीही तेवढीच यात्रेकरूंची गर्दी होती.
तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) चे प्रवक्ते व मंदिराचे कामकाज व्यवस्थापक थलारी रवी यांनी सांगितले की, शनिवारी एक लाखाहून अधिक भाविक मंदिरात पोहोचले आणि रविवारीही तेवढीच संख्या होती. शनिवारी रात्री 18 तासांच्या कालावधीत, सुमारे ८९ हजार यात्रेकरूंनी भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले तर ४८ हजार ७०० भाविकांनी आपले मुंडन केले.
रवी पुढे म्हणाले की, तिरुमला टेकडीवर एक लाखाहून अधिक प्रवासी असून ते रांगेत उभे राहू शकत नाहीत. वार्षिक ब्रह्मोत्सव, वैकुंठ एकादशी गरुड सेवेच्या उत्सवाच्या प्रसंगी गर्दीपेक्षा सध्याच्या यात्रेकरूंची गर्दी जास्त असते. यात्रेकरूंना देवाचे दर्शन घेण्यासाठी ४८ तास लागत असल्याचे रवी यांनी सांगितले.
मंदिर प्रशासनच्या अंदाजानुसार, सध्या मंदिरात दर तासाला ४५०० भाविक दर्शन घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे दर्शनासाठी नागरिकांना दोन दिवस लागत आहेत. TTD चे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनी टेकडीवरील प्रचंड गर्दी पाहता देवतेच्या दर्शनाची वेळ येईपर्यंत भाविकांना संयमाने वाट पाहण्याचे आवाहन केले. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे आणि गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या काळात लादलेले सर्व निर्बंध हटवल्यामुळे यात्रेकरूंच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.