इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतातील तीर्थक्षेत्रांमध्ये प्रसिद्ध असे हे तिरुपती क्षेत्र आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान म्हणूनही ओळखले जाते. आंध्रप्रदेश राज्याच्या दक्षिण टोकावरील चित्तूर जिल्ह्यात तिरुपती हे शहर. याच शहराच्या जवळ असलेल्या डोंगरावर बालाजीचे हे मंदिर आहे. याच डोंगराला ‘तिरुमला’ असे म्हणतात. तिरुमला डोंगर रांगेत एकूण ७ डोंगर आहेत. त्याला सात फण्यांचा आदिशेष असे म्हणतात. हे देवस्थान अगदी शेवटच्या डोंगरावर वसले आहे. या परिसराला सप्तगिरी असेही म्हणतात. हा डोंगर हा लाल दगडाचा आहे.
भगवान तिरुपतीच्या देवळातील मिळणाऱ्या या लाडूंचा इतिहास देखील ३०० वर्ष जुना आहे. इतक्या वर्षांची परंपरा असूनही या लाडवांच्या चवीत बदल झालेला नाही. कारण लाडवांचा इतिहास बघता पल्लव राजवटीत या लाडवांचा उदय झाला. सन १४८० च्या शिलालेखांच्या अभ्यासात या लाडवांचा उल्लेख केला आहे तेव्हा या लाडवांना मनोहरम म्हणून ओळखले जात होते. मात्र चवीत व आकारात बदल होत गेले.
चव, गोड तयार करणे ही एक पाककला आहे. वर्षानुवर्षे ठरलेलं साहित्यांचे अचूक प्रमाण आणि लाडू बनवण्यासाठी लागणारे कौश्यल्य असलेले हात, गुणवत्तेत कोणतीही तडजोड नाही यामुळे इतकी शतकं उलटून सुद्धा या लाडवांची गोडी कमी झालेली नाही. या लाडवांमध्ये बेसन, काजू,साखर तूप,वेलची इत्यादी सामग्री वापरली जाते.
आता यापुढे तिरुपतीला भेट देणाऱ्या भाविकांना शून्य आधारित अर्थसंकल्पीय नैसर्गिक शेती (सेंद्रिय) उत्पादन आणि कीटकनाशके, रासायनिक खते व पालापाचोळा मुक्त कृषी उत्पादनापासून तयार करण्यात आलेला नैवेद्यम, लाडू प्रसादम आणि अन्न प्रसादम मिळणार आहे. तिरुमला मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना हे लाडू मिळतीलच. याशिवाय अण्णावरम, श्रीकलाहस्ती आणि श्रीसैलमसह अन्य १२ मंदिरातही मिळणार आहे.
आंध्र प्रदेश विपणन महासंघ खरेदी करून कीटकनाशक मुक्त कृषी मालापासून तयार केलेले लाडू, प्रसाद या १२ मंदिरांनाही पुरविणार आहे.स्वयंपाकाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी देवस्थानने पुढाकार घेतला आहे. झिरो बजेट नैसर्गिक शेती हा उपक्रम २०१६ मध्ये आंध्र प्रदेशात सुरू झाला होता. राज्याने ६.२५ लाख शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यामुळे हा जगातील सर्वांत मोठा नैसर्गिक शेती कार्यक्रम बनला.
बालाजीच्या मंदिराचा संपूर्ण कलश सोन्याचा आहे. ऐतिहासिक पुराव्यानुसार मंदिर किमान 2000 वर्षे जुने आहे. चौल व पल्लव साम्राज्यांनी या मंदिराला भरभराटीस आणले. 1517 मध्ये कृष्णदेवराय राजाने गर्भगृहाच्या शिखराला सोन्याचा थर दिला. पुढे मराठा सेनापती रघुजी भोसले यांनी देखभालीची व्यवस्था केली. म्हैसूर व गदवल संस्थानाद्वारेही या मोठ्या देणग्या मिळाल्या. ब्रिटिश काळात मंदिराचे प्रशासन येथिल हाथिरामजी मठाला सोपवण्यात आले. ही व्यवस्था 1933 पर्यंत सुरु होती. 1933 मध्ये मद्रास विधानसभेच्या विशेष कायद्याअन्वये ‘तिरुमला तिरु पती देवस्थानम’ समितीची स्थापना करण्यात आली. यालाच तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) असे म्हणतात.
तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) यावर्षी २५ हजार शेतकऱ्यांकडे अशा १२ प्रकारच्या २२ हजार टन रसायनमुक्त कृषीमालाची मागणी नोंदविली आहे. ५ हजार स्वयं-सहाय्यता गटाकडून तयार करण्यात आलेला हा कृषिमाल आंध्र प्रदेश विपणन महासंघ खरेदी करून टीटीडीला पुरविणार आहे. शून्यावर आधारित अर्थसंकल्पीय नैसर्गिक कृषी उत्पादन तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानम आपल्या गोशाळेतून पशुधन देणार आहे. आंध्र प्रदेशातील सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना १,३५५ गायी दिल्या जाणार आहेत.
रयथु साधिकारा संस्था ही कृषी उत्पादनांचा प्रचार आणि खरेदीसाठी गावातील संस्थांसोबत काम करत आहे. या माध्यमातून ८००० कर्मचाऱ्यांची फौज तयार करण्यात आली आहे. झिरो बजेट नैसर्गिक शेती करणारे शेतकरी पेरणीसाठी आरवायएसएसने सुचविलेल्या नऊ प्रकारच्या बियाण्यांचा वापर करतात, असे आरवायएसएसचे कार्यकारी उपाध्यक्ष टी. विजय कुमार यांनी सांगितले. सेंटर फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. व्ही. रमांजनेयुलू म्हणाले की, अनेक जिल्ह्यांमध्ये याचा प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे.
व्यंकटेश्वराचं दर्शन घेतल्यावर भाविकांना लाडू प्रसाद म्हणून दिला जातो तसेच भाविकांना जर हा प्रसाद सोबत घेऊन जायचा असेल तर तशीही सोय करण्यात आली आहे, नाममात्र शुल्क यावर आकारले जाते. दिवसाला तब्बल १५०००० इतके लाडू बनवले जातात या लाडवाला श्रीवरी, पुट्टु असेही म्हटले जाते. लाडवांच्या लोकप्रियतेमुळे आणि स्वादिष्ट चवीमुळे तिरुपती देवस्थानला २००९ साली पेटंट सुद्धा मिळाले आहे.
Tirupati Balaji Devasthan Laddu Big Decision