लंडन – अठराव्या शतकात म्हैसूरचे प्रशासक राहिलेले टिपू सुलतान यांच्या अनेक साहसकथा ख्यात आहेत. १८व्या आणि १९व्या शतकात ब्रिटीशांचे भारतावर राज्य होते. त्यामुळे भारतातील अनेक ऐतिहासिक वस्तू ब्रिटीशांच्या ताब्यात आहेत. टिपू सुलतान यांच्या सिंहासनावर लावलेल्या सुवर्णजडित वाघाच्या शिराचा मुकूट हा सुद्धा त्यापैकीच एक आहे. हा मुकूट घेण्याचा आपण विचार करीत असाल तर तुमची निराशा होऊ शकते. कारण, या मुकूटाच्या विक्रीस ब्रिटीश सरकारने तात्पुरती स्थगिती दिली आहे. हा ऐतिहासिक मुकूट ब्रिटनमध्येच राहण्याच्या दृष्टीने त्याला ब्रिटीश ग्राहकच मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाघाच्या मुकूटातील रत्नजडीत आभूषणांची किंमत जवळपास १५ लाख पाऊंड आहे. प्रतिबंधित निर्यात यादीत मुकूटाचा समावेश केल्यामुळे ब्रिटनमधील एखाद्या संग्रहालय किंवा संस्थेला खरेदी करण्याची संधी ब्रिटिश सरकारने उपलब्ध करून दिली आहे.
जाणकारांच्या माहितीनुसार, टिपू सुलतान यांच्या सिंहासनाला आठ सोन्याचे वाघ होते. ब्रिटीश सरकारने विक्रीला काढलेला सोन्याच्या वाघाचे शीर त्यापैकी एक आहे. टिपू सुलतान यांना म्हैसूरचा वाघ म्हणूनही ओळखले जायचे. सिंहासनाच्या तीन जिवंत समाकालीन प्रतिमा ब्रिटनमध्येच आहेत.
ब्रिटनचे सांस्कृतिक आणि कला मंत्री लॉर्ड स्टिफन पार्किन्सन म्हणाले, हा चमकदार मुकूट टिपू सुलतानची गोष्ट दाखवतो आणि आम्हाला आमच्या शाही इतिहासात घेऊन जातो. हा शाही मुकूट खरेदी करण्यासाठी ब्रिटनचा ग्राहक पुढे येईल अशी आम्हाला आशा आहे. टिपू सुलतान यांच्या पराभवानंतर त्यांच्या खजान्याच्या अनेक वस्तू ब्रिटनमध्ये पोहोचल्या आहेत. तिथे कविता (जॉन किट्स), कथा (चार्ल्स डिकेंस, विल्की कॉलिन्स), कलाकार (जेएमडब्ल्यू टर्नर) यांच्यावर त्या वस्तूंचा प्रभाव पडला आहे.