सिंधुदुर्गनगरी – आज सकाळी 8 वाजता मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार तिलारी नदी धोका पातळीला पोचली असून कर्ली आणि वाघोटन नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 43.600 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 10 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 9.600 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.
तिलारी नदीकाठच्या गावांनी पुढील 5 दिवस सतर्क
राहून प्रशासनास सहकार्य करावे – उप कार्यकारी अभियंता सु.दु.आंबी
तिलारी नदीपात्रातील पाण्याची पातळी सद्यस्थितीत 43.60 मीटर ( धोका पातळी) इतकी आहे. पुढील चोवीस तासात मुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. संभाव्य अतिवृष्टीमुळे सांडव्यावरून होणाऱ्या विसर्गामध्ये वाढ होऊन नदीतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. तिलारी नदीकाठच्या गावातील सर्व ग्रामस्थ, शेतकरी यांनी पुढील 5 दिवस सतर्क राहून सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन पाटबंधारे प्रकल्प, बांधकाम विभाग चराठे – सावंतवाडीचे उप कार्यकारी अभियंता सु.दु. आंबी यांनी केले आहे.
तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पांतर्गत तिलारी नदीवर मुख्य धरण हे कोनाळ गावाजवळ आहे. तिलारी नदी धरणापासून 21 कि.मी. लांबीचा प्रवास करून गोवा राज्यात प्रवेश करते. आज 23 जुलै रोजी धरण तलांक 111.70 मीटर (94.80 टक्के ) भरले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे येणारा विसर्ग थेट नदी प्रवाहात वर्ग होत आहे. सद्यःस्थितीत सांडव्यावरून 1123 घ.मी. / सेकंद या प्रमाणे विसर्ग सुरू असून संकल्पीत पूर विसर्ग 3233 घ.मी./सेकंद इतका आहे.