इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– स्वयंपाकघरातील वनस्पती, पदार्थ –
तीळ
एक तीळ सात जणांनी खाल्ली अशी म्हण आहे. ती खरी की खोटी, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. आपल्या घरात अनेक खाद्य पदार्थांमध्ये तीळ वापरली जाते. संक्रांतीला तर तिळीचे लाडूही करतात. आज आपण याच तिळीविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत….
हे सुमारे १ मीटर उंची असणारे वर्षायु (१ वर्षे जगणारे) झाड आहे. पाने ७ ते १२ सेंटीमीटर लांब असतात. फुले निळसर, पांढरट, तांबडी व पिवळट असतात. याला २ते ८ सेंटीमीटर लांब शेंग येते व त्यात , लहान पांढऱ्या,तांबूस किंवा काळ्या बीया येतात. या बियाच औषधात वापरल्या जातात.
काळे तीळ औषधात श्रेष्ठ असतात. तीळ जगभर वापरले जातात. सबंध भारतात तीळाचे उत्पादन होते. तिळाच्या बीयांत सर्वात जास्त तेल असते. तसेच कॅल्शियम सर्वात जास्त असते. इतर खनिजे पण मोठ्या प्रमाणात असतात. तिळाच्या वापराने रक्तदाब नियंत्रणात राहतो. उपाशी पोटीची साखर (फास्टींग शुगर) नियंत्रणात राहते.
गुण :-
तीळ पचायला जड, तेलकट,गोड ,तुरट किंचीत कडू चवीचे परंतु पचल्यावर गोड रस निर्माण करणारे व ऊष्ण आहेत.तीळ वात कमी करतात परंतु कफ व पित्त वाढवतात . त्यामुळे थंडीत तिळ भरपूर वापरावे. इतर ऋतुत जपून वापरावे.
आपल्याकडेपण संक्रांतीला तिळ भरपूर वापरले जातात. इतरवेळी थोडक्या प्रमाणात वापरतात. म्हणजे पदार्थ करतांना वरून सजवण्यासाठी तिळ वापरले जातात.उदा. कोथिंबीर वड्या , ढोकळे,गुळपापडी ई.
उपयोग:—-
१) तीळ स्निग्ध म्हणजेच तेलकट आहेत. ते शरीराला आतून व बाहेरूनपण मऊपणा आणतात. त्वचेचा कोरडेपणा तीळाने कमी होतो.म्हणून थंडीत तीळाचे तेल , उटणे अंगाला लावतात. तसेच पोटातून पण वड्या ,लाडू ,चटणी या स्वरूपात घेतात. संक्रांतीला तिळ वापरण्यामागे हेच शास्त्रीय कारण आहे.
२) आयुर्वेदात विविध प्रकारची सिध्द तेले वापरायला सांगितली आहेत ,ती सर्व तिळ तेलापासून करतात.मुळात तेल हा शब्दच तीळापासून उत्पन्न झाला आहे. तिलोद्भवम् तैलम्. तीळापासून होते ते तैल. ही औषधी सिध्द तेलं बाहेरून लावायला तसेच पोटातून घ्यायलापण उपयोगी पडतात.पक्षाघात ( पॅरालिसिस ),संधीवात,अस्थिभंग ( फ्रॅक्चर) या मध्ये ही तेलं खूप उपयोगी पडतात.
३) मूळव्याधीतील वेदना कमी करण्यासाठी तीळ बारीक वाटून त्याची पुरचुंडी करून ती मूळव्याधीवर बसवतात. लवकर भरून न येणाऱ्या व्रणावर पण ही पुरचुंडी बांधतात,त्याने जखम लवकर भरून येते. रक्ती मूळव्याधीत पण काळे तिळ व लोणी खायला द्यावे.
४)केस वाढण्यास व काळे आणि रेशमासारखे मऊ होण्यास पानांचा व मूळांचा काढा करून त्याने केस धुतात आणि तीळतेलाने शिरोभ्यंग करतात. डोक्याला लावण्यासाठी ब्राम्ही माक्याचे तिळतेलात सिद्ध केलेले तेल चांगले असते.
५) तीळामुळे बुध्दी चांगली होते.
६) पाळीच्यावेळी पोटात दुखण्याचा त्रास होत असेल, अंगावर कमी जात असेल तर १ चमचा काळे तीळ २ वेळा चावून खावे. या मुळे दात व हिरड्यापण मजबूत होतात.
७) तीळाचा विशेष हा की तीळाने कृश व्यक्ती पुष्ट होते व स्थूल व्यक्ती कृश होते. त्यामुळे सर्वांनीच तिळ वापरावे.
तिळ पाककृती :-
तिळाच्या पोळ्या . आपल्याकडे संक्रांतीला हमखास केल्या जातात.
साहित्य :- भाजलेले तिळ १ वाटी , बारीक चिरलेला गूळ २ वाट्या ,बारीक दळलेली कणिक ४ वाट्या , तेल पाव वाटी .
कृती:- तिळ मिक्सरवर बारीक करावे, त्यात गूळ घालून परत एकदा फिरवून घ्यावे. याचा एकजीव छान मऊ गोळा होतो.
परातीत कणिक काढून घ्यावी .तेल कडकडीत गरम करून कणकेवर ओतावे .सगळ्या कणकेला तेल लावून घ्यावे.मुठीत दाबून त्याचा मुटका होतो का बघावे. तसा झाला कि मोहन योग्य आहे असे समजावे. मग कणिक चांगली तिंबून तासभर ठेवून द्यावी.
नंतर कणकेचा लिंबाएवढा गोळा घेऊन थोडा लाटावा ,त्यात तयार केलेले तिळगूळाचे सारण पुरणाप्रमाणे भरावे. मंद गॅसवर गुलाबी रंगावर भाजून घ्यावी. अशा सर्व पोळ्या कराव्यात. गार झाल्यावर साजूक तूपाच्या गोळ्याबरोबर खायला द्याव्या. या पोळ्या गारच खाव्या . प्रवासात पण छान टिकतात.
मात्र लक्षात ठेवा ———आता या पोळ्या करून बघू नका. कारण सध्या उन्हाळा सुरू आहे. वातावरण थोडे गार झाले की जरूर करून बघा.
डॉ. नीलिमा हेमंत राजगुरु
आयुर्वेदाचार्य
मो. 9422761801.
ई मेल – drneelimarajguru@gmail.com
Til Importance Health Food by Neelima Rajguru