वाराणसी – बनारस संगीत घराण्यातील अढळ तारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठुमरी सम्राज्ञी गिरीजा देवी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. पण, यंदा कोरोनाच्या संकटामुळे कोणतेही कार्यक्रम घेता आले नाहीत. २४ ऑक्टोबर २०१७ रोजी त्यांचे निधन झाले आहे.
त्यांच्या मृत्यूपूर्वी म्हणजे २४ एप्रिल २०१७ रोजी ‘सूर गंगा’ नामक एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले या देखील उपस्थित होत्या. एकाच वेळी या दोन्ही महान गायिका एका मंचावर आल्याची ही वाराणसीतील पहिलीच वेळ असावी. या कार्यक्रमात आशा भोसले यांनी गिरीजा देवी यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. या प्रसंगाने त्यांना एवढे भरून आले की, एरवी लीलया लागणारा त्यांचा स्वर गळा दाटून आल्याने लागला नाही. आर.डी. बर्मन देखील आपल्याला गिरीजा देवी यांची गाणी ऐकायला सांगत, अशी आठवण त्यांनी त्यावेळी सांगितली होती.
गिरीजा देवी यांचा जन्म १९२९ मध्ये जमीनदार घराण्यात झाला. त्यामुळे गाण्याशी त्यांच्या घराचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. पण, मुलीची आवड म्हणून त्यांचे वडील रामदेव राय यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांना संगीताचे शिक्षण देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला गुरू पं. शरयू प्रसाद मिश्र आणि त्यानंतर पं. श्रीचंद्र मिश्र यांनी त्यांना संगीतातील विविध प्रकारांचे शिक्षण दिले. ख्याल, ठुमरीसह शास्त्रीय संगीतातील सर्व प्रकारांमध्ये त्यांना पारंगत केले, आणि गिरीजा देवींनी देखील अत्यंत निष्ठेने हे सगळे धडे गिरवले. या दरम्यान त्यांनी ‘याद रहे’ यातही अभिनय केला.










