इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पोलिस हे जनतेचे रक्षक समजले जातात, त्यामुळे पोलिसांनी सर्व नियमांचे आणि शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. वाहतुकीच्या नियमांचे तर नागरिकांनी काटेकोर पालन करावे, अशी वाहतूक पोलिसांची इच्छा असते परंतु एखाद्या वेळी पोलिसांनीच वाहतूक नियमांचे उल्लंघन केले तर त्याचे काय होते हे कुणालाच सांगता येणार नाही? परंतु गुजरातमध्ये मात्र वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली.
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात तैनात असलेल्या तीन पोलीस हवालदारांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याची दखल घेत या तिघांना निलंबित करण्यात आले आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, तीन पोलीस कारमधून प्रवास करताना संगीताचा आनंद घेताना दिसत आहेत, परंतु या दरम्यान ते वाहतूक नियमांचे पालन करताना किंवा मास्क घालण्याच्या आदेशाचे पालन करताना दिसत नाहीत. याप्रकरणी कारवाई करताना पूर्व कच्छचे पोलीस अधीक्षक मयूर पाटील यांनी तिघांची वागणूक अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.
अभद्र वर्तन, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आणि पोलिसांची प्रतिमा मलिन करणारी कृत्ये केल्याबद्दल पूर्व कच्छचे पोलीस अधीक्षक मयूर पाटील यांनी तीन पोलिसांवर ही कारवाई केली आहे. निलंबित करण्यात आलेल्या कॉन्स्टेबलमध्ये जगदीश सोलंकी, हरेश चौधरी आणि राजा हिरागर यांचा समावेश आहे. हे तिन्ही पोलिस गांधीधाम ‘ए’ डिव्हिजन पोलिस स्टेशनमध्ये तैनात आहेत.
विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये चार कॉन्स्टेबल कारमध्ये चढताना, संगीताच्या सुरात डोलताना आणि गाताना दिसत आहेत. परंतु ड्रायव्हरसह त्यांच्यापैकी कोणीही सीटबेल्ट घातला नव्हता. तसेच मास्कही घातलेला नव्हता. तेव्हा हा व्हिडिओ एका पोलिसाने मोबाईल फोनवरून शूट केला होता. मात्र या पोलीसाने हे शूटींग कधी केली हे स्पष्ट झालेले नाही. व्हिडिओमध्ये दिसणारा चौथा हवालदार बनास कांठा जिल्ह्यात तैनात आहे. त्याच्यावरही कारवाई करण्याचे त्याच्या वरिष्ठांना कळविण्यात आले आहे.