अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नांदगाव तालुक्यातील बोलठाण जवळच्या खारी नदीला आलेल्या पूरातून बैलगाडीतून जात असतांना या पाण्यात बैलगाडी पलटी झाली. त्यात पुजा दिनकर सोनवणे (१५) साक्षी अनिल सोनवणे (११) व मिनाबाई दिलीप बहिरव (४५) हे तिघे पूराच्या पाण्यात वाहून गेले. मात्र सुदैवाने पाच जण वाचले. बैलगाडी पलटी होताच त्यांनी आरडा-ओरड केल्याने शेतात काम करुन परतणा-या शेतक-यांनी धाव घेत पूराच्या पाण्यात उड्या मारुन पाच जणांना वाचविले. मात्र यात दुर्दैवाने तिघांचा मृत्यू झाला. दोघाचे शव मिळाले असले तरी एका मुलीचा संध्याकाळ पर्यंत शोध घेऊन तिचा मृतदेह मात्र मिळू शकला नाही. कन्नड तालूक्यातील आडगाव येथील शेतकरी सुखलाल बहिरव यांची नाशिक जिल्हयातील बोलठाण जवळच्या जातेगाव शिवारात शेती असून शेती कामासाठी कन्नड तालूक्यातील आडगाव येथून महिला कामासाठी आल्या होत्या. आज आचानक या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला. त्यात ही दुर्दैवी घटना घडली.