त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील ब्राम्हणवाडे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात साडेतीन वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. वेळूंजे येथील बिबट्याने एका लहान मुलाला ठार केले असल्याची घटना ताजी असतांनाच पुन्हा एकदा ब्राम्हणवाडे येथील शेतावर राहणाऱ्या कुटुंबातील चार वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
अधिक माहिती अशी की, ब्राह्मणवाडे शिवारातील ब्राह्मणवाडे पिंपळद रस्त्यावरील गट क्रमांक ३३१,१०० ओहळ नाका येथील नवसू पांडू कोरडे यांच्या घरासमोर त्यांची साडेतीन वर्षांची बालीका नयना नवसू कोरडे ही खेळत असताना अंधारातून आलेल्या बिबट्याने आई समोरच वर्षीय बालिकेला बिबट्याने लक्ष करत तिच्यावर हल्ला केल्याने तिचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
घरातील माणसांनी आरडाओरडा करत पाठलाग केला मात्र काही मिटर अंतरावर बिबटया नयनाला टाकून पळाला. मानेवर जखम झाल्यामुळे या चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच पोलीस पाटील अशोक गांगुर्डे, उपसरपंच योगेश आहेर, तलाठी मनोज राठोड, कोतवाल गंगाराम गोरे, पप्पू सकाळे, समाधान सकाळे, वनविभागाचे शिंदे, जगताप, देशपांडे, वगळे, आहेर यांनी घटना स्थळी आले. त्यांनी घटनेची माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली.
त्र्यंबक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे, पीएसआय अश्विनी टिळे, पोलीस नाईक सचिन गवळी, श्रावण साळवे, सचिन गांगुर्डे, थेटे, लोहार यांनी घटना स्थळी धाव घेतली. दरम्यान, सदर बालिकेचा मृतदेह त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालया मार्फत नाशिक जिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदणासाठी हलवण्यात आला आहे. संतप्त ग्रामस्थांनी त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात वनविभाग कर्मचाऱ्यांना घेराव घालून वेळोवेळी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही वनविभाग या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष का करत आहे ? असा जाब विचारला.
यावेळी किशन मैडा, भीमा गांगुर्डे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. धुमोडी, वेळुंजे आणि आता ब्राह्मणवाडे असे एकाच परिसरातील गावांमध्ये आता पर्यंत तीन बालके बळी गेले आहेत. आईच्या जवळून तिच्या लेकराला उचलून नेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.