विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोना विषाणूमुळे आता सुदृढ युवकांमध्येही झटका (स्ट्रोक) येण्याचा धोका वाढला आहे. वयस्क लोकांना येणार्या गंभीर स्वरूपाच्या झटक्यांप्रमाणे ३० ते ४० वयोगटातील युवकांना झटके येत असल्याचे अमेरिकेच्या थॉमस जेफरसन विद्यापीठाच्या संशोधकांच्या संशोधनात आढळले आहे. विशेष म्हणजे कोरोनाबाधित होण्यापूर्वी या युवकांना झटक्यांचे कोणतेही लक्षणे दिसत नव्हते. झटक्यांपासून बचावासाठी युवकांनी काय करावे हे आपण जाणून घेउयात.
स्ट्रोक म्हणजे काय
मेंदूत रक्तपुरवठ्याला बाधा आल्यास किंवा मेंदूतील एखादी रक्तवाहिनी फुटून रक्तस्राव झाल्यास स्ट्रोक असे म्हणतात. मेंदूत रक्त पोहोचण्यास बाधा येण्याच्या स्थितीला स्ट्रोक असे म्हणू शकतो. या स्थितीत मेंदूत ऑक्सिजन आणि रक्ताचा पुरवठा होऊ शकत नाही. ऑक्सिजनविना मेंदूतील कोशिका तुटतात.
अधिक गंभीर स्वरूपाचे स्ट्रोक
संशोधनात असे आढळले आहे की, सामान्य झटक्यांच्या तुलनेत संक्रमित झालेल्या रुग्णांना येणारे झटके वेगळ्या तीव्रतेचे असू शकतात. अशा झटक्याचा परिणाम मेंदूच्या दोन्ही भागांवर होतो. त्यामुळे अशा रुग्णांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो.
विनालक्षण रुग्णांना अधिक धोका
लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये रक्तच्या गाठी बनतात. स्ट्रोक येण्याचे हे प्रमुख कारण असू शकते. ज्या रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे कळले नाही, अशांना वेगवेगळ्या आजारांवरील उपचारासाठी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले तिथे त्यांना स्ट्रोक आले. मुख्य संशोधक अँडोवास्कूलर सर्जरी तज्ज्ञ पास्कल जबबोर सांगतात, आम्हाला ३०, ४०, ५० वर्षांच्या रुग्णांमध्ये स्ट्रोकचा धोका मोठ्या प्रमाणात दिसत आहे. साधारण परिस्थितीत असे स्ट्रोक ७० ते ८० वर्षांच्या रुग्णांमध्ये पाहिले गेले आहेत.
लक्षणे ओळखा
ऑस्ट्रेलियाच्या स्ट्रोक फाउंडेशनच्या माहितीनुसार, अशा रुग्णांच्या शरीरातील सामान्य बदलसुद्धा स्ट्रोक येण्याचे संकेत देतात. या लक्षणाकडे दुर्लक्ष करता कामा नये.
चेहऱ्यावर परिणाम ः स्ट्रोकचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे शरीराचा कोणताही भाग कमजोर पडणे होय. त्याचा परिणाम बहुतांश चेहर्यावर पाहायला मिळतो. चेहर्याचा एक भाग सुन्न होतो. हसल्यावर चेहरा विचित्र दिसतो. अनेकदा तोंड वाकडे होण्याची शक्यता आहे.
बोलण्याची समस्या ः वयाच्या कोणत्याही टप्प्यात स्ट्रोक येऊ शकतो. या आजारामुळे रुग्णाच्या बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. एखाद्या व्यक्तिला बोलण्यास त्रास होत असेल किंवा शब्दांचे उच्चार व्यवस्थित येत नसतील तर त्याला स्ट्रोकचा धोका संभावतो.
डोळ्यांवर परिणाम ः स्ट्रोकचा डोळ्यांवरही परिणाम होऊ शकतो. त्याने डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते. किंवा डोळ्यात धुरकटपणा येऊ शकतो.
डोकेदुखी आणि मासपेशीला वेदना ः जर तुम्हाला नेहमीच डोकेदुखी, अचानक चक्कर येत असतील किंवा मासपेशींमध्ये वेदना जाणवत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ह्या वेदना मोठ्या आजाराचे लक्षणे असू शकतात.
बरे होणाऱ्या रुग्णांनी घ्यावी काळजी
संशोधकांच्या मते, कोरोनाबाधित रुग्णांनी बरे होता अधिक काळजी घ्यावी. शरीरात होणार्या कोणत्याही लहान बदलांकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.