नाशिक – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यभरात संचारबंदी लागू केली असताना देवळाली कॅम्प परिसरातील कलापूर्णम तीर्थ धाम येथे शेकडो नागरिक जमल्याची बाब समोर आली आहे. जैन बांधवांचा दीक्षा समारंभ येथे आयोजित करण्यात आला होता. अखेर याची दखल घेत कॅन्टॉन्मेंट बोर्ड प्रशासनाने आयोजकांना ५० हजार रुपयांचा दंड करुन तेथील मालमत्ता सील केली आहे.
कॅन्टॉन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संकटामुळे राज्यात संचारबंदी आणि कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे या काळात कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाही. तरीही देवळाली कॅम्पच्या बालगृह रोड परिसरातील कलापूर्णम तीर्थ धाम या जैन समाजाच्या धार्मिकस्थळी ७ जैन नागरिकांचा भव्य दीक्षा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यासाठी देशाच्या विविध भागातून शेकडो भाविक व समाजबांधव येथे दाखल झाले होते. राज्यातील सर्व मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश असतांना येथील भगवान पार्श्वनाथ मंदिरही खुले होते. या बाबीची दखल घेत कुमार यांनी समारंभस्थळाला भेट दिली. कोरोना निर्बंधांचे उल्लंघन झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आयोजकांना ५० हजार रुपयांचा दंड केला. तसेच, येथील मालमत्ता सील केली आहे. दरम्यान, येथील समारंभ रद्द करण्यात आला आहे.
पोलिसांची भूमिका संशयास्पद
संचारबंदी काळात सार्वजनिक समारंभ आयोजित झाल्याच्या प्रकाराकडे देवळाली कॅम्प पोलिसांनी कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी कारवाई न केल्याने कॅन्टॉन्मेंट बोर्ड प्रशासनाने अखेर कारवाई केली आहे. शहरात विना मास्क फिरणाऱ्या आणि कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या सर्वसामान्यांना लक्ष्य करणारे देवळाली कॅम्प पोलिस या कार्यक्रमाबाबत मूग गिळून का बसले होते, असा प्रश्न कॅम्पवासियांकडून विचारला जात आहे.