भोपाळ – मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात प्रशांत गाडे नावाचा एक तरुण राहतो. खंडवा तसे मध्य प्रदेशच्या मुख्य रस्त्यावरील शहर, पण गोंडांचा इतिहास, जंगलाची समृद्धी आणि निसर्गाची किमया या गोष्टींसाठी प्रसिद्ध जिल्हा. पण आता शेकडोंच्या मनगटांमध्ये बळ देणाऱ्या प्रशांतमुळेही खंडवाला वेगळी ओळख मिळाली आहे. स्वस्त आणि अत्याधुनिक रोबोटिक हँड तयार करणाऱ्या प्रशांतमुळे हजारो दिव्यांगांना बाहुबली होता आले आहे.
प्रशांतला या कार्याची प्रेरणा एका वेगळ्या घटनेतून मिळाली आहे. प्रशांत लहान असताना त्याच्या कुटुंबातील एका ज्येष्ठ सदस्याचा मृत्यू झाला. त्यावेळी अंत्यसंस्कारापूर्वी त्यांचे पार्थिव अंगणात आणले आणि त्यांच्या अंगावरील सर्व कपडे काढून त्यांना स्नान घालण्यात आले. प्रशांत लहान होता, त्याने कुतुहलापोटी कुणाला तरी विचारले, तर त्यांनी सांगितले की आपण या पृथ्वीवर काहीच घेऊन आलेलो नसतो. त्यामुळे घेऊन जाण्याचाही प्रश्न येत नाही. त्यावर प्रशांतला असे वाटले की, आपण जाताना काहीच घेऊन जाऊ शकत नाही, तर किमान या समाजाला काहीतरी देऊन तर नक्कीच जाऊ शकतो. आज तोच प्रशांत हजारोंचे आयुष्य बदलविण्याचे काम करीत आहे.
प्रशांत अलिकडेच चार दिवसांच्या काशी यात्रेवर होता. या यात्रेत त्याने ९० पेक्षा अधिक दिव्यांगांना रोबोटिक हँड देऊन पुण्याला रवाना झाला. आजोबांच्या इच्छेपोटी त्याने इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. पण त्याने ते अर्ध्यावर सोडून दिले आणि संशोधनाच्या कामात लागला. आता तो तीन लाख रुपयांचा जर्मन हँड दहा हजार रुपयांत देत आहे. हाच हात तयार करायला अडीच ते तीन लाख रुपये लागतात. कारण या हाताने तुम्ही कितीही वजन उचलू शकता, जेवण करू शकता, कॉम्प्युटर चालवू शकता आणि बाईकही चालवू शकता, असा दावा करण्यात आला आहे.
सुधा मूर्तींनी घेतली दखल
२८ वर्षाच्या या तरुणाच्या कार्याची दखल इन्फोसिसच्या चेअरमन आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता सुधा मूर्ती यांनी घेतली आहे. सुधा मूर्ती यांच्या इनाली फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रशांतने हजारो दिव्यांगांना हात दिले आहेत. प्रशांतला एकदा कौन बनेगा करोडपती या शोमध्येही आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळेही त्याचे कार्य जगभरात पोहचण्यात मदत झाली आहे. सेवाभावी वृत्तीने सुरू केलेले कार्य किती जणांना आनंद देऊ शकते, याचा प्रत्यय यानिमित्ताने येत आहे.