नवी दिल्ली – प्राप्तिकर विभागाने सुरु केलेल्या नव्या कर पोर्टलवर येत असलेल्या समस्यांबाबत आज केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे अधिकारी आणि इन्फोसिसचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर देखील उपस्थित होते.
प्राप्तिकर विभागाने सात जून रोजी नव्या ई-फायलिंग पोर्टल 2.0 चा शुभारंभ केला. मात्र पोर्टलची सुरुवात झाल्यापासूनच या पोर्टलच्या कामात अनेक अडचणी येत असल्याचे सोशल मिडीयावर पुढे आले आहे.या तक्रारींची दखल घेत, वित्तमंत्र्यांनी देखील हे पोर्टल विकसित करणाऱ्या इन्फोसिस कंपनीला या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यास सांगितले होते. मात्र, त्यानंतरही या पोर्टलवर तांत्रिक अडचणी येत असल्याची तक्रार अनेक कर दात्यांनी केली होती. त्यामुळे या विषयावर वित्त मंत्रालय आणि इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांमध्ये एक बैठक घेण्याचा निर्णय घेतला गेला .
या पोर्टलवर येणाऱ्या अडचणी दूर करत ती वापरकर्त्यांसाठी अधिक सुलभ होईल, यासाठी पावले उचलावीत असे सीतारमण यांनी इन्फोसिसच्या अधिकाऱ्यांना सांगितले. या पोर्टलवर करदाते आणि इतर हितसंबंधी लोकांना येत असलेल्या अडचणींविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. करदात्यांना सुलभतेणे कर भरता यावा या अशी याची रचना असणे अपेक्षित होते असे निर्मला सीतारमण म्हणाल्या.
आता आणखी वेळ न घालवता या पोर्टलवर येणाऱ्या सर्व तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर कराव्या, सेवांमध्ये सुधारणा करावी आणि करदात्यांच्या तक्रारींचे प्राधान्याने निवारण करावे, असे निर्देश त्यांनी इन्फोसिस ला दिले. करदात्यांनी कोविडचे संकट असतांनाही वेळेत कर अनुपालन केल्याबद्दल सीतारमण यांनी त्यांचे कौतुक केले.