नवी दिल्ली – कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी दिल्या जाणा-या कोविशील्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढविल्यावरून सध्या वाद सुरू आहे. सगळ्या ठिकाणी लोकांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे. लोकांमध्ये ४ ते ६ आठवडे, ६ ते ८ आठवडे किंवा ८ ते १२ आठवड्याच्या अंतरावरून संभ्रम निर्माण झाला आहे. भारताने या अंतराला वाढविले तर, ब्रिटेनने अंतर घटविले आहे.
सहा महिन्याच्या आत कधीही कोविशील्डचा दुसरा डोस घेतला जाऊ शकतो. हा डोस बूस्टर डोसप्रमाणे प्रभावी ठरू शकणार आहे, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. लशीचा पहिला डोस घेतल्याच्या चार आठवड्यानंतरपासून सहा महिन्याच्या आत कधीही दुसरा डोस घेतला जाऊ शकतो, असे तज्ज्ञ सत्यजित रथ यांनी सांगितले.
राष्ट्रीय तांत्रिक सल्लागारांच्या गटाच्या शिफारसीवर सरकारने गेल्या आठवड्यात कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवून १२ ते १६ आठवडे केले होते. आधी हे अंतर ६ ते ८ आठवडे होते. भारतात आढळलेला कोरोना विषाणू बी.१.६१७ व्हेरिएंट वेगाने फैलावत असल्याने त्याच्या एक दिवसानंतर ब्रिटनने दोन डोसमधील लशीचे अंतर १२ आठवड्यावरून घटवून ८ आठवडे केले. कोरोनातून मुक्त झालेल्या लोकांना चार ते आठ आठवड्यानंतर लस दिली गेली पाहिजे, असे आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.
दुस-या डोसबद्दल तज्ज्ञांचे मत
तज्ज्ञ वैज्ञानिक सत्यजित रथ म्हणतात, दोन डोसच्या मधील अंतर खूपच लवचिक आहे. चार आठवड्यानंतरपासून सहा महिन्याच्या आत कधीही दुसरा डोस घेतला जाऊ शकतो. लशीचा डोस कधीही घेणे सुरक्षित आहे. परंतु चार आठवड्याच्या आधीच दुसरा डोस घेतल्यास त्याचा प्रभाव अधिक राहणार नाही. वैज्ञानिक विनिता बल म्हणतात, अंतर वाढविण्यासारखे निर्णय अनेक तथ्यांना समोर ठेवून घेण्यात येतात. जास्त अंतर असल्यास दुसरा डोस अधिक प्रभावी ठरू शकतो.