मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
भारतात अनेक धर्म पंथ असून सर्व धर्म आणि पंथ आपापल्या आचरण पद्धती स्वावलंब करीत गुण्यागोविंदाने नांदत आहेत. महाराष्ट्रात देखील अनेक धर्म संप्रदाय ( पंथ ) असून त्यामध्ये प्रामुख्याने वारकरी संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. याशिवाय अन्य देखील पंथ- संप्रदाय आहेत, त्यापैकीच महानुभाव संप्रदाय याची स्थापना सुमारे आठशे वर्षांपूर्वी झाली, असे मानले जाते.
महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक तथा संस्थापक श्री चक्रधर स्वामी असल्याचे सांगण्यात येते. यंदा श्री चक्रधर स्वामींचा अष्टशताब्दी महोत्सव देशभरात साजरा करण्यात येत आहे. महानुभव पंथात पंचकृष्ण अवतार मानला असून त्यापैकीच एक म्हणजे श्री चक्रधर स्वामी त्यांनी सुमारे आठशे वर्षांपूर्वी तत्कालीन धर्मातील कर्मकांड आणि अंधश्रद्धावर प्रहार करीत एक वेगळी धर्मआचरण पद्धती सांगितली. त्यांच्या तत्त्वज्ञानानुसार मनुष्याने आयुष्यात मांसाहार व्यसनांपासून दूर राहणे हे प्रमुख आचरण पद्धती मानली जाते. पंथीय अनुयायी कोणत्याही प्रकारे मांसाहार, मद्यपान तथा कोणतेही कोणत्याही वाईट व्यसनांपासून दूर राहतात.
सुमारे ८०० वर्षापूर्वीच्या काळात श्री चक्रधर स्वामींनी संपूर्ण महाराष्ट्रात परिभ्रमण केले. उत्तर महाराष्ट्र, खांदेश, विदर्भ मराठवाडा या भागात संचार करीत त्यांनी महानुभव पंथाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला. त्याच काळात खांदेशातील भडगाव नजीक असलेल्या कनाशी येथे काही काळ वास्तव्यास होते. सध्या श्री क्षेत्र कनाशी येथे श्री चक्रधर स्वामींचे भव्य मंदिर असून या गावातील भाविक धार्मिक दृष्ट्या आचरण करणारे आहेत. या तीर्थस्थानाच्या दर्शनासाठी नेहमीच भाविक नेहमीच येत असतात. तसेच येथे यात्रा एक मोठी यात्रा देखील भरते.
विशेष म्हणजे कनाशी हे गाव गेल्या आठशे वर्षांपासून मांसाहारापासून तसेच अन्य व्यसनांपासून दूर आहे हे या गावचे वैशिष्ट्य म्हणता येईल. बदलत्या काळात अनेक जण मांसाहार आणि व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्याचे पाहायला मिळत असतानाच, या सर्वांपासून दूर राहून संपूर्ण शाकाहारी गाव अशी ओळख जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील कनाशीने निर्माण केली आहे, गेल्या आठशे वर्ष पासून या गावानं शाकाहारी राहण्याची अखंड परंपरा जपली आहे. तसेच देशभरातील महानुभाव पंथीय संप्रदायातील संत, महंत, शिष्य, उपासक, पुजारी, साधक, भाविक तथा अनुयायी देखील याच आचरण पध्दतीचा अवलंब करतात.
सुमारे १२ व्या शतकातील तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी कनाशीला भेट दिल्याची तसेच एका ब्राह्मणाच्या घरी थांबून त्याला ज्ञानदान केल्याचेही एक आख्यायिका आजही सांगितली जाते. महानुभाव पंथाची प्रमुख एक जीवन पद्धती आहे त्यामध्ये अनुयायी हे शाकाहारी आणि निर्व्यसनी असावे या शिकवणीनुसार आठशे वर्षांपासून या कानाशी गावात सर्व जाती धर्माच्या लोकांनी महानुभाव पंथ स्वीकारला आहे, ज्यांनी तो स्वीकारला नसला तरी त्यांनी मांसाहार आणि व्यसनाधीनता पासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे.
शाकाहार हा मानवीय आहार असल्याने आणि या मध्ये अहिंसा असल्याने या परिसरातील नागरिकांनी मोठ्या आनंदाने शाकाहार जीवन पद्धती स्वीकारली असल्याचे दिसून येते जळगाव जिल्ह्यातील कनाशी हे तीन हजार लोकवस्तीचे असून येथे महानुभव पंथाचे उपासक, साधक तथा अनुयायी आहे. महानुभव पंथाची उपासनापद्धती आणि शिकवण यामुळे शेकडो वर्षापासून या गावात मांसाहारावर बंदी आहे. भिन्न विचार अन् भिन्न रुचीची माणसे एका गावात नांदतानाही शाकाहारावर मात्र त्यांचे एकमत असल्याचे दिसून येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यापासून साधारण ८ किलोमीटर व कजगाव रेल्वे स्टेशनपासून सुमारे ५ कि. मी. अंतरावर असलेल्या महानुभाव पंथाच्या उपासनेची सुमारे आठशे वर्षांची अखंड परंपरा या गावाला आहे. या कनाशीने आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे. इथे येणारा सहसा रिकाम्या हाताने जात नाही, असे म्हटले जाते. गावातील प्रत्येक व्यक्ती आपण शाकाहारी आणि निर्व्यसनी असल्याचे अभिमानाने आणि आनंदाने सांगत असतो. साधारणतः कोणत्याही धर्म पंथात प्राण्यांची हिंसा करणे किंवा मांसाहार मद्यपान व अन्य व्यसन करणे याचा उल्लेख आढळत नाही, असे दिसून येते. तरीही काही ठिकाणी सर्रासपणे मुक्या प्राण्यांची मोठ्या प्रमाणात हत्या केल्या जाते, ही अत्यंत दुर्दैव आहे, असे या पंथतील संत महंत यांनी व्यक्त केले असून सर्वांनी कनाशी या गावाचा आदर्श घ्यावा, असेही मत त्यांनी मांडले आहे.
This Village is Totally Vegetarian from 800 years Kanashi Jalgaon Maharashtra Mahanubhav Pantha