नवी दिल्ली – भारतीय संस्कृतीत मंदिरांना विशेषत : जुन्या आणि प्राचिन मंदिरांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भारतातील सर्वच प्रांतात अशी सुंदर, भव्य आणि आकर्षक मंदिरे प्राचीन आढळतात. त्याचप्रमाणे जगभरातील अनेक देशात देखील आगळीवेगळी आणि प्राचीन मंदिरे आढळून येतात. असेच एक वेगळे प्राचीन मंदिर चक्क समुद्राचा असून शेकडो वर्षापासून या मंदिराची सुरक्षा विषारी साप करत असल्याचे आढळून आले आहे.
मुस्लिम देश इंडोनेशियामध्ये बाली येथे असलेले समुद्री देवीचे एक मंदिर खूप विशेष असून ते समुद्राच्या किनाऱ्याच्या आतमध्ये एका मोठ्या खडकावर बांधले गेले आहे. हा खडक हजारो वर्षांपासून समुद्राच्या पाण्यातील प्रवाळ घटकांपासून म्हणजे सागरी वनस्पती, प्राणी आणि जिवाणूपासून तयार झाला आहे. या अनोख्या मंदिराच्या बांधणीची कहाणीसुद्धा खूप रंजक आहे, सदर मंदिर ‘तनाह लोट टेम्पल’ म्हणून ओळखले जाते. वास्तविक, स्थानिक भाषेत ‘तनाह लोट’ म्हणजे समुद्रातील जमीन होय.

सदर मंदिर बालीतील समुद्री किनाऱ्यावर बांधल्या गेलेल्या सात मंदिरांपैकी एक मंदिर आहे, ज्याला साखळी मंदीर म्हणून बांधले गेले आहे. या मालिकेत बांधलेल्या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक मंदिरातून समान गोष्टी स्पष्टपणे दिसू शकतात.
१९८० मध्ये या मंदिराचा खडक कमकुवत होऊ लागल्याने सदर मंदिर धोकादायक घोषित झाले. त्यानंतर हा खडक वाचविण्यासाठी जपान सरकारने इंडोनेशियन सरकारला मदत केली. या दरम्यान, खडकाच्या एक तृतीयांश भागाला कृत्रिम खडकांनी झाकून एक नवीन रूप देण्यात आले.










