मुंबई – भारतात कोणतेही मंदिर हे श्रीराम मंदिर, भगवान शिवमंदिर, श्रीविष्णू मंदिर, श्रीकृष्ण मंदिर आदी नावांनी ओळखले जाते. दक्षिण भारतात अशीच काही सुंदर, भव्य आणि आगळीवेगळी मंदिरे आहेत. त्यातीलच एक मंदिर हे तेथील देवाच्या नव्हे तर भक्ताच्या नावाने ओळखले जाते.
शक्यतो कोणत्या मंदिरांमध्ये कोणती देवदेवता आहेत त्यावरूनच त्याची नावे ठेवली जातात. पण दक्षिण भारतामध्ये तेलगणातील मुलुगु जिल्ह्यात वेंकटापूर मंडळाच्या पालमपेट गावात वसलेले रामप्पा मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. हे एक असे मंदिर आहे ज्याचे नाव कोणत्याही देवाचे नाही तर ज्याने ते बांधले त्याच्या नावावर आहे. असे वैशिष्ट्य असलेले कदाचित जगातील एकमेव मंदिर असेल. पलामपेट हे एक छोटेसे गाव असले, तरीही ते शेकडो वर्षांपासून ते वसलेले आहे.
भगवान शिव हे रामप्पा मंदिरात विराजमान आहेत, त्यामुळे ‘रामलिंगेश्वरा मंदिर’ म्हणून देखील ते ओळखले जाते. या मंदिराच्या बांधकामाची कहाणी खूप रंजक आहे. असे म्हटले जाते की, सन १२१३ मध्ये, आंध्र प्रदेशातील काकतीय्या राजघराण्यातील महाराजा गणपती देव यांच्या मनात अचानक शिव मंदिर बांधण्याची कल्पना आली. यानंतर त्याने आपला कारागीर रामप्पाला वर्षानुवर्षे टिकणारे मंदिर बांधायला सांगितले. रामप्पानेही आपल्या राजाच्या आज्ञेचे पालन केले आणि कारागिरीने एक भव्य, सुंदर आणि विशाल मंदिर बांधले.
असे म्हटले जाते की, सुंदर मंदिर पाहून राजाला इतका आनंद झाला की, त्याने त्या कारागिरांच्या नावावर या मंदिराचे नाव ठेवले. १३ व्या शतकात भारतात आलेल्या इटालियन प्रसिद्ध व्यापारी आणि अन्वेषक मार्को पोलो यांनी या मंदिराला ‘मंदिरांच्या आकाशगंगेतील सर्वात उज्ज्वल तारा’ म्हटले. सुमारे ८०० वर्षांहूनही अधिक काळानंतरही हे मंदिर पूर्वीइतकेच अजूनही मजबूत आहे. पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांनी मंदिराच्या मजबूत बांधकामाचे रहस्य जाणून घेण्यासाठी तेथील दगडाचा तुकडा कापला, त्यानंतर सत्य समोर आले की, तो दगड खूप हलका होता आणि पाण्यात बुडण्याऐवजी तो तरंगत होता.
तेव्हा मंदिराच्या सामर्थ्याचे रहस्य कळाले की, अतिशय हलक्या वजनाच्या दगडांनी मंदिर बांधले गेले आहे, त्यामुळे हे मंदिर तुटत नाही. परंतु असे हलके दगड कोठून आले, कारण असे दगड संपूर्ण जगात कुठेही आढळत नाहीत, जे पाण्यामध्ये तरंगू शकतात (राम सेतूच्या दगड सोडून). तर रामप्पाने स्वत: असे दगड बनवले होते आणि तेही ८०० वर्षांपूर्वी ? त्यांच्याकडे असे तंत्र होते की, जे दगडांना इतके हलके करतात किंवा ते पाण्यात तरंगतात? हे सर्व प्रश्न आजही कायम आहेत, कारण आजपर्यत कोणालाही त्याचे रहस्य माहित झाले नाही.