हैदराबाद – सुमारे दीड वर्षाच्या कोरोनाच्या संकटानंतर आता देशभरातील सर्वच व्यवहार पुन्हा एकदा सुरळीत होऊ लागले आहेत. त्यातच सणासुदीच्या दिवसात मंदिरे देखील खुली झाली आहेत. सहाजिकच या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. विशेषतः तिरुपतीचा बालाजी आणि शिर्डीच्या साईबाबा यांच्या दर्शनासाठी भाविकांचा जास्त ओढा दिसून येतो. पुर्वी देव दर्शनासाठी प्रचंड रांगा लागलेल्या दिसून येत असत, परंतु आता ऑनलाईन बुकिंग पद्धतीमुळे रांगा लावण्याची गरज नाही.
देशभरात अनेक मंदिर तथा धार्मिक मठ तथा संस्थान हे श्रीमंत असून त्यांच्याकडे सोन्या-चांदीचे खजिने असल्याचे सांगण्यात येते. वास्तविक बघता कोणत्याही देवाला सोन्या-चांदीचे आकर्षण नसून केवळ भोळ्या भक्तांचा भक्तिभाव प्रिय असतो, असे म्हटले जाते. तरीही अनेक श्रीमंत आणि दानशूर भाविक मंदिरांना सोन्या चांदीचे दान करत असतात. त्यामुळे देवाच्या मूर्तीला आणि मंदिराच्या कळसावर सोन्या-चांदीची आकर्षक सजावट करण्याची प्रथा अलीकडच्या काळात वाढू लागली आहे.
सध्या तेलंगणामध्ये देखील अशाच प्रकारे एका नव्या मंदिरासाठी सोन्याची सजावट करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यासाठी तेथील राज्य सरकार रिझर्व बँकेकडून 125 किलो सोने खरेदी करणार आहे. याबद्दल भाविकांमध्ये चर्चा सुरू उत्सुकता देखील आहे. तेलंगणा सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 125 किलो सोने घेऊन नव्याने उभारण्यात येत असलेल्या श्री यदाद्री मंदिराच्या घुमटात सोन्याची आकर्षक सजावट करेल, अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी यदाद्रीला भेट दिल्यानंतर केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, या धार्मिक व शुभ कार्यासाठी राज्याला सुमारे 65 कोटी रुपयांचे सोने खरेदी करण्याची गरज आहे त्याकरिता मंदिराचे अधिकारी तिरुमाला – तिरुपती देवस्थान येथे काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या अंदाजानुसार मंदिराला 125 किलो सोन्याची गरज आहे. सरकारने ते मिळवायचे ठरवले ठरले असून किंमत 65 कोटी रुपये देऊन भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सोने खरेदी करण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे.
पैसे जमा झाल्यानंतर लगेचच राज्य सरकार हे RBI कडून सोने खरेदी करणार असून आम्हाला शुद्ध सोने मिळेल, याचा आनंद आहे, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याचा प्रमुख आणि पहिला दाता म्हणून, माझ्या कुटुंबाच्या वतीने सुमारे सव्वा किलो सोने दान करणार आहे. त्याचप्रमाणे अनेक मंत्री आणि आमदारही या दान कार्यासाठी पुढे आले आहेत.
कारण श्री यदाद्री मंदिराचे बांधकाम मुख्यमंत्री राव यांच्या स्वप्नाशी निगडीत आहे. शेजारच्या आंध्र प्रदेशातील तिरुमलाच्या समृद्धीप्रमाणेच आपल्या राज्यातील भाविकांचे आणि विशेषतः मुख्यमंत्री राव यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शेकडो शिल्पकार आणि कारागीर हैदराबादपासून सुमारे 70 किमी अंतरावर असलेल्या यादगिरीगुट्टाच्या नयनरम्य डोंगरांमध्ये यादाद्री मंदिरात रोज चोवीस तास काम करत आहेत.