नवी दिल्ली – देशात डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) अनेक पावले उचलली आहेत. डिजिटल व्यवहार करणा-या ग्राहकांसाठी आरबीआयने एक सूचना जारी केली आहे. तांत्रिक अपग्रेड करण्यासाठी काही तासांसाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रांन्सफर (एनईएफटी) ची सुविधा उपलब्ध नसेल. २२ मे रोजी व्यवहार बंद झाल्यानंतर हे अपग्रेडेशन होणार आहे. त्यामुळे २२ मे रोजी रात्री बारा वाजेपासून २३ मे दुपारी दोन वाजेपर्यंत ही सुविधा बंद असेल. एनईएफटी सेवेची कामगिरी आणखी चांगली करण्यासाठी अपग्रेडेशन सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला एनईएफटीचे काम करायचे असल्यास या दिवशी करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
एनईएफटीची सेवा निशुल्क
आरबीआयने ६ जून २०१९ ला सामान्य नागरिकांना मोठी भेट देताना रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) आणि एनईएफटी सेवा निशुल्क केली होती. देशात डिजिटल बँकिंगला प्रत्साहन देण्यासाठी आरबीआयने हे पाऊल उचलले होते. सर्व बँकांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. त्यापूर्वी एनईएफटी सेवा सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू होती. महिन्याच्या पहिल्या आणि तिस-या शनिवारी याची वेळ सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत होती.