मुंबई – बँकेतील बचत खात्यात प्रमाणेच अनेक ग्राहक हे टपाल कार्यालयातील पोस्ट बँकेत देखील सेव्हींग करतात, परंतु आजपासून पोस्ट बँकेचा नवीन नियम लागू झाला असून ग्राहकांनी याबाबत माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.
दि. १ ऑक्टोबरपासून इंडिया पोस्ट बँक आपल्या एटीएमच्या वापरावर नवीन शुल्क आकारणार आहे. म्हणजेच एटीएम व डेबिट कार्डच्या वापरावर ग्राहकांना अधिक शुल्क द्यावे लागेल. इंडिया पोस्टने या शुल्काचा तपशील जाहीर केला आहे. यामध्ये १० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंतचे शुल्क वेगवेगळ्या व्यवहारांवर आकारण्यात आले आहे. विशेष म्हणजे ग्राहकाच्या खात्यातील शिल्लक कमी असताना त्याने एटीएममधून जास्त पैसे काढण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही शुल्क भरावे लागेल.
बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, १ ऑक्टोबरपासून इंडिया पोस्ट बँक द्वारे एटीएम वापरावर काही शुल्क आकारले जात आहे. यामध्ये आता डेबिट कार्ड रिप्लेसमेंट चार्ज ३०० रुपये जीएसटी आकारले जाईल. तसेच ग्राहकांनी खात्यातील शिल्लक कमी असताना एटीएममध्ये जास्त रक्कम काढण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या बदल्यात त्याला २० रुपये प्लस जीएसटी भरावा लागेल.
त्याचप्रमाणे मेट्रो शहरांमध्ये ग्राहक इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून फक्त ३ वेळा मोफत व्यवहार करू शकतो. त्याच वेळी, नॉन मेट्रो शहरांमध्ये ५ वेळा विनामूल्य पैसे काढण्याची संधी असेल. यानंतर मात्र व्यवहारावर २० रुपये प्लस जीएसटी भरावा लागेल. तसेच ५ वेळा विनामूल्य व्यवहारांनंतर इंडिया पोस्ट एटीएममधून पैसे काढले तर ग्राहकाला १० रुपये प्लस जीएसटी भरावा लागेल.
मेट्रो शहरांमध्ये, ग्राहकाने इतर बँकेच्या एटीएममधून बिगर आर्थिक व्यवहार केला, म्हणजे शिल्लक तपासणी किंवा इतर काम केले, तर फक्त ३ वेळा मोफत असेल. तर नॉन-मेट्रो शहरांमध्ये ही संख्या ५ वेळा असेल. यानंतर ८ रुपये प्लस जीएसटी भरावा लागेल. परंतु ग्राहकाने इंडिया पोस्ट एटीएम मधून हेच व्यवहार केले तर ५ वेळा विनामूल्य व्यवहारानंतर त्याच्याकडून शुल्क ५ रूपये प्लस जीएसटी आकारला जाईल.
ग्राहकाकडून एटीएम किंवा डेबिट कार्डचे वार्षिक देखभाल शुल्क म्हणून १२५ रुपये जीएसटी आकारला जाईल. तसेच एसएमएसद्वारे ग्राहकांना सतर्क करण्यासाठी इंडिया पोस्टने १२ रुपये आकारले आहेत. सदर शुल्क नियमावली ही १ ऑक्टोबर २०२१ ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे.