नाशिक – अधिसूचनेच्या अंमलबजावणीच्या संदर्भात पालकमंत्री, प्रधान सचिव (मदत व पुनर्वसन) यांचेशी झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात झालेल्या चर्चेनुसार पुढील प्रमाणे खुलासा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
1. ग्राहकांना खरेदीसाठी जीवनावश्यक बाबींचे दुकानात जाण्यास प्रतिबंध असला तरी विविध मार्गांनी घरपोच जीवनावश्यक बाबी प्राप्त करून घेण्याचा पर्याय पूर्णतः खुला आहे. त्यामुळे विनाकारण साठा करून ठेवू नये.
2. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या मध्ये गर्दीचे नियंत्रण करणे शक्य होत नसल्याने बाजार समिती बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याच वेळी शेतकऱ्याकडील भाजीपाला व अन्य माल स्वीकृत करण्यासाठी विकेंद्रित व्यवस्था तयार करणे बाबत ची मुभा व निर्देश संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती यांना दिलेले आहे. त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाही करणे अपेक्षित आहे. तसेच शहरांतर्गत अथवा राज्यांतर्गत शेतमाल वाहतुकीस कोणताही प्रतिबंध करण्यात आलेला नाही.
3. उद्योगधंद्यांच्या बाबतीत इन सीटू उद्योग सुरू ठेवणे बाबत परवानगी दिली आहे. इन सीटू चा अर्थ ज्या उद्योगांमध्ये कर्मचाऱ्यांची भोजन व निवास व्यवस्था होऊ शकते त्यांनी तशी व्यवस्था करावी. ज्या उद्योगांमध्ये अशी व्यवस्था करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसेल तर अशा काही उद्योजकांनी एकत्र येऊन त्या उद्योगाच्या दोन किलोमीटर परिसरातील निवास योग्य इमारतीमध्ये कर्मचाऱ्यांची सोय करण्यास मुभा राहील. कमीत कमी मनुष्यबळात या कंपन्या सुरू ठेवणे व सर्व कर्मचारी यांनी सतत ओळखपत्र जवळ बाळगणे अनिवार्य राहील. कर्मचारी त्यांच्या घरांकडे खासगी अथवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था द्वारे अथवा कंपनीच्या वाहतूक व्यवस्थित द्वारे ये-जा करतात त्यामुळे औद्योगिक क्षेत्र व निवासी क्षेत्र यामध्ये संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण होऊ नये तसेच निवासी भागातून औद्योगिक क्षेत्राकडे जाण्याच्या नावाखाली अन्य नागरिकांनी देखील मुक्त संचार करू नये या दृष्टीने ही सूचना देण्यात आलेली आहे.
4. औषध निर्मिती व ऑक्सिजन निर्मिती कंपन्या निर्वेधपणे सुरू राहतील. औषध निर्मिती या संद्येमध्ये प्रत्यक्ष औषध निर्मिती सुरू राहण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या अनुषांगिक उत्पादन कंपन्यांचाही समावेश होईल. कमीत कमी मनुष्यबळात या कंपन्या सुरू ठेवणे व सर्व कर्मचारी यांनी सतत ओळखपत्र जवळ बाळगणे अनिवार्य राहील.
5. भाजी विक्री ची वेळ सकाळी 7 ते 12 ही निश्चित करण्यात आली आहे व त्या करिता सविस्तर आदेश संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडून पारित करण्यात आले आहेत. या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना नियमाचे उल्लंघन झाल्यास त्या ठिकाणची विक्री पुढील दहा दिवसांकरिता ताबडतोब बंद करण्यात येईल.
6. दूध विक्री घरपोच करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. दुधाचे अत्यंत नाशवंत स्वरूप विचारात घेता घरपोच विक्री पूर्णतः शक्य नसल्यास दूध विक्री सकाळी 7 ते 12 व सायंकाळी 5 ते 7 या वेळेत स्थानिक स्वराज्य संस्था निश्चित करेल अशा ठिकाणावरून करता येईल असे निर्देशित करण्यात येत आहे. या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना नियमाचे उल्लंघन झाल्यास त्या ठिकाणची विक्री पुढील दहा दिवसांकरिता ताबडतोब बंद करण्यात येईल.