मुंबई – स्कोडाच्या गाड्यांनी कायमच भारतीयांच्या मनावर राज्य केले आहे. झेक प्रजासत्ताकच्या या कंपनीने काही दिवसांपूर्वी Skoda Kushaq आणि Skoda Octavia सेडान या दोन नव्या एसयूव्ही कार लॉन्च केल्या. या दोन्ही गाड्यांनी अनेकांना सध्या वेड लावले आहे. लॉन्चिंगनंतर अवघ्या एक महिन्याच्या आत या गाडीच्या विक्रीत तब्बल २३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
जुलै २०२१ मध्ये स्कोडा इंडियाच्या एकूण २ हजार ८० गाड्यांची विक्री झाली. गेल्या वर्षी जुलैच्या तुलनेत हा आकडा २३४ टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये कंपनीच्या ९२२ गाड्यांची विक्री झाली होती. तर जून २०२१ मध्ये केवळ ७३४ गाड्यांची विक्री झाली होती. त्यादृष्टीने जूनच्या तुलनेत तर ३२० टक्क्यांनी विक्रीमध्ये वाढ झालेली आहे.
कंपनीने मात्र या वाढीचे संपूर्ण श्रेय स्कोडा कुशाकला दिले आहे. लॉन्चिंगनंतर एक आठवड्याच्या आतच गाडीला २ हजार बुकींग मिळाल्या. तर आतापर्यंत ६ हजार बुकींग झाल्या आहेत. या गाडीची एक्स-शोरुम किंमत १०.५० लाख रुपये आहे. पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही पर्यायांमध्ये गाडी उपलब्ध आहे.
नव्या स्कोडा कुशाकमध्ये १० इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टीम देण्यात आली आहे. ही सिस्टीम एप्पल, कारप्ले आणि अँड्रॉईड आटो सपोर्टसोबतच मिळत आहे. याशिवाय एसयूव्हीमध्ये वायरलेस मिररलिंक, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट, क्रुज कंट्रोल, ७-स्पिकर म्युझिक सिस्टीम हे नव्या गाडीचे वैशिष्ट्य आहे.