इंदूर (मध्य प्रदेश) – बदल्यत्या जीवन आणि आहारशैलीमुळे तळलेले पदार्थ घराघरात बनविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, तळणानंतरचे खाद्य तेलाचे पुढे काय होते. सर्वसाधारणपणे ते फेकून दिले जाते. मात्र, आता याच निरुपयोगी तळलेल्या खाद्यतेलाची दखल देशातील सर्वात स्वच्छ शहराने घेतली आहे. त्यामुळेच हे तेल गोळा करण्याचा निश्चय या महापालिकेने केला आहे.
देशातील इंधनाची वाढती गरज आणि वाढते दर लक्षात घेता विविध पर्याय आजमावण्यात येत आहे. देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक अससेल्या इंदूरमध्ये जेवणामध्ये वापरलेले तळलेले तेल घरा-घरातून खरेदी करून त्यापासून बायोडिझेल तयार करण्यात येणार आहे. या कामासाठी इंदूरमधील महानगरपलिकेने एका खासगी कंपनीसोबत करार केला आहे. अशा प्रकारे कोणत्याही महापालिकेकडून केला जाणारा हा पहिला करार आहे.
अधिकार्यांनी सांगितले, की या कराराअंतर्गत घरांमध्ये वापरण्यात येणारे खाद्यतेल, रहिवासी कल्याण संघाच्या मदतीने खरेदी केले जाणार आहे. त्या मोबदल्यात खासगी कंपनीतर्फे महापालिका आणि विक्रेते या दोघांनाही १५-१५ रुपये प्रतिकिलोच्या दराने परतफेड केली जाणार आहे. खाद्यतेल एकापेक्षा अधिक वेळा वापरून तयार करण्यात येणार्या अन्नपदार्थांमुळे स्थूलता, हृदयरोग आणि इतर आजारांचा धोका बळावतो.
सुरुवातीच्या काळात शहरातील घरांमधून दर महिन्यात एक लाख किलो वापरण्यात आलेले खाद्यतेल जमा होण्याचा अंदाज आहे. या तेलापासून दुसर्या कंपनीतर्फे बायोडिझेल तयार करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांमध्ये सन २०१७, २०१८, २०१९ आणि २०२० या वर्षांत इंदूर शहराने देशात अव्वल स्थान प्राप्त केले होते.