मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज दुपारी संपन्न झाली. या बैठकीला उपस्थित असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच चव्हाण यांनी तत्काळ मंत्रिमंडळ बैठक सोडून बाहेर पडले आणि आपले निवासस्थान गाठले.
गेल्या वर्षीही चव्हाण यांना कोरोनाची बाधा झाली होती. उपचाराद्वारे त्यांनी कोरोनावर मात केली. त्यांना अत्यंत सौम्य लक्षणे जाणवल्याने त्यांनी सकाळीच चाचणी केली होती. त्यानंतर ते आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित झाले. त्याचवेळी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल आला. त्यांच्या स्वीय सचिवांनी त्यांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. चव्हाण यांनी तत्काळ मंत्रिमंडळ बैठकीतून काढता पाय घेतला आणि ते निवासस्थानी परतले. त्यानंतर चव्हाण यांनी ट्विटरद्वारे कोरोना चाचणीची माहिती दिली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. आता संपूर्ण मंत्रिमंडळच त्यांच्या संपर्कात आल्याने भीती व्यक्त केली जात आहे.
https://twitter.com/AshokChavanINC/status/1486684638433013766?s=20
दरम्यान, चव्हाण हे काँग्रेस पक्षाच्या बैठकीलाही उपस्थित होते. राज्य प्रभारी एच के पाटील हे सध्या महाराष्ट्राच्या दैऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकीसंदर्भात रणनिती ठरविण्यासाठी काँग्रेस नेत्यांची आज त्यांनी बैठक घेतली. या बैठकीला चव्हाण उपस्थित होते. त्यामुळे या बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार आहे.