नाशिक जिल्ह्याचे कोकण अर्थात हरसूल
मथळा वाचून आश्चर्य वाटले ना. हो, पण अनेकांना हरसूल परिसराविषयी आणि त्याच्या जौविक विविधतेविषयी फारशी माहिती नाही. पश्चिम घाटाच्या प्रारंभीच असलेला हा भाग गुजरातच्या डांग जिल्ह्याला जोडलेला आहे. निसर्गाचा आविष्कार काय असतो ते येथे गेल्यावरच कळते.
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेला, सह्याद्रीच्या मोठ्या रांगेत (मेन लाईन) बरेच प्रसिद्ध घाट आणि पर्वत स्थित आहेत. आणि त्यातून खाली उतरल्यावर बराचसा भूभाग हा नाशिक जिल्ह्यात मोडतो. इगतपुरी, उतवड, आंबोली, वाघेरा, पेठ ही ठिकाणे घाट माथ्यावर आहेत. त्यातील इगतपुरीचा थळ घाट आणि पेठचा सावल घाट हे प्रसिद्ध आणि रहदारीचे आहेत. पण सर्वात निसर्ग रम्य आणि उभ्या सरळ उतरंडीचा घाट आहे तो वाघेरा आणि हरसूल दरम्यानचा घाट. त्यामुळे तशी रहदारी बेताची. किंबहुना त्यामुळेच येथील डोंगर उतरंडीच्या जंगलामध्ये जैव विविधता टिकून आहे. नाही म्हणायला जंगलतोड चालू आहेच. पण वनविभागाने मनावर घेतले तर हा ग्रीन स्पॉट आणखी बहरु शकतो.
त्र्यंबकच्या पश्चिम उत्तरेला वाघेरा नावाचे गाव आहे. गिरणाऱ्याहून सरळ पुढे कश्यपी धरणाच्या पुढे वाघेरा लागते. वाघेरा गावाजवळ,अंदाजे समुद्रसपाटीपासून ३४०० फूट उंचीचा बोडका किल्ला आहे. त्याच्या पायथ्याशी मानवनिर्मित सुरेख मोठा जलाशय आहे. खरी मजा येते ती वाघेऱ्याहून खाली उतरणारा घाट. वळणावळणाचा, उभा, खोलवर घेऊन जाणारा हा घाट आपणास थेट हरसूलला घेऊन जातो.
आपण कोकणात आल्याचाच भास हरसूल येथे आल्यावर होतो. घाटापासून खाली हरसूल तालुक्यात वनराई संपूर्णपणे बहरलेली आहे. आंबा, फणस, याबरोबर साग, सादडा, अर्जुन, चिंच, मोह, बांबू आणि कितीतरी वनस्पतींनी हा भाग भरला आहे. हरसूल तालुक्याचा पश्चिम भाग थेट गुजरात सीमेला लागतो. सुप्रसिद्ध दमणगंगा आणि दावलीगंगा यांच्या संगमावरील दावलेश्वर मंदिर अतिशय पुरातन असून येथील भाग आणि जंगल मानवापासून शाबूत आहे.
वनस्पतीशास्त्रज्ञांसाठी हरसूल परिसर एक सुरेख ठिकाण होऊ शकते. येथून पुढे डांगच्या परिसराला सुरवात होते आणि निसर्गरूप बदलत असल्याचे आपणास जाणवते. हरसूलला प्रचंड पाऊस पडतो. त्यामुळे संपूर्ण हिरवाई पसरते. त्यातूनच छोट्या नाल्यांपासून निर्माण होणारे असंख्य धबधबे येथील आकर्षण आहेत. हरसूल तालुक्यात खूप पाडे आहेत. पाडे म्हणजे आदिवासी लोकांच्या छोट्या छोट्या वाड्या.
ठाणापाडा, हत्तीपाडा, चिखलपाडा आदी. त्यातीलच एका पाड्यावरील मुलीने स्वतःची आणि भारताची ओळख जगाला करून दिली. ती म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस तथा धावपटू कविता राऊत. ती सावरपाड्याची. डोंगरांच्या चढाई, उतराईची नैसर्गिक संपदा या भागाला मिळाली आहे. त्यातूनच असे आदिवासी तरुण, तरुणी खेळामध्ये प्राविण्य दाखवताना दिसत आहेत.
तर अशा या हरसूलच्या जंगलात, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिकच्या वतीने निसर्ग परीक्षण करताना संस्थेचे संस्थापक कै. बिश्वरूप राहा यांना १० डिसेंबर २०१६ रोजी पिंगळा पक्षी कुळातील, फॉरेस्ट औलेट (फॉरेस्ट पिंगळा) या पक्ष्याचे दर्शन झाले. हा पक्षी BNHS ने प्रसिद्ध केलेल्या सूची नुसार ‘क्रिटिकल एनडेंजर्ड स्पेसिज’ मध्ये येतो. आणि हा महाराष्ट्रात प्रथम या भागात दिसला. सातपुडा पर्वतीय क्षेत्रातील पक्ष्याच्या सह्याद्रीतील जंगलात हे प्रथम दर्शन झाले आणि हरसूलचे नाव देशभरात गेले. त्यानंतर पक्षी निरीक्षकांचा येथे राबता सुरू झाला. या जंगलात सर्प, गरुड, लांब चोचीचे गिधाड, मोन्टेग्यू ससाणा, लाल डोक्याचा ससाणा, मध गरुड, खरुची, शिक्रा ह्या शिकारी पक्ष्यांची सर्वात जास्त सायटिंग होते.
हरसूल पासून साधारण दहा ते बारा किमी. पश्चिमेला खैराई किल्ला आहे. या किल्ल्यावर जाताना व आजूबाजूस प्रचंड वनसंपदा आहे. अगदी कोकणातल्या जंगलांसारखे. साग, सादडा, मोह, आंबा या वृक्षांबरोबर कितीतरी गवताचे आणि झुडुपांचे येथे साम्राज्य आहे. नेमक्या याच वातावरणमुळे आणि दमट हवामानामुळे येथे जवळजवळ ७० ते ८० प्रकारची फुलपाखरे येथे दिसतात. त्यांची वर्गवारी करून अभ्यास करण्यासाठी खूप मोठा स्कोप आहे.
महाराष्ट्राचे राज्यफुलपाखरू ‘राणी पाकोळी’, ब्लू मॉर्मन हे फुलपाखरू हाताच्या पंज्या एवढे मोठे असते. मखमली निळ्या पांढऱ्या रंगाचे असते. ह्या फुलपाखराचे आवडते ठिकाण म्हणजे हरसूलचे जंगल. जवळच असलेल्या खोरीपाडा येथे गिधाडांसाठी खाद्य रेस्टॉरंट चालू केले आहे वनविभागाने. तेथे २०० ते ३०० गिधाडे पाहिल्याची नोंद आहे. २००० साली गिधाडांची संख्या अभूतपूर्व घटली होती. ती आता वनविभाग आणि गावकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे वाढीस दिसत आहे ही चांगली बाब आहे.
This is Known as a Kokan of Nashik Biodiversity
Forest Wildlife Animals