मुंबई – भारतात पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना आवाहन करणे अद्याप थांबलेले नाही, तिकडे इस्राईलने आपल्या देशातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस द्यायलाही सुरुवात केली आहे. अशा प्रकारचा बुस्टर डोस देणारा इस्राईल हा जगातील पहिला देश ठरला आहे. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांनाच फायजर कंपनीचा बुस्टर डोस दिला जात आहे.
कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट वेगाने पसरायला सुरुवात झाल्यावर इस्राईलमध्ये रुग्णांची संख्या वाढत होती. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षाही भयंकर स्थिती उद्भवली होती. गेल्या महिन्यात तर रुग्णसंख्या चांगलीच वाढलेली होती. त्यानंतर इस्राईल सरकारने तातडीने उपाययोजना करायला सुरुवात केली. आरोग्यमंत्र्यांनी आता बुस्टर डोस देण्याचे तातडीचे आदेश लागू केले.
इस्राईलमध्ये ज्या लोकांना फायजरचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही रोगप्रतिकारशक्ती कमी जाणवत असेल त्यांनी तातडीने फायजरचा बुस्टर डोस घ्यावा, असे सरकारने म्हटले आहे. उलट भारतात लस उपलब्ध नाही म्हणून मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्र बंद पडत आहेत. इस्राईलच्या तुलनेत भारताकडे प्रगत राष्ट्र म्हणून बघितले जाते. मात्र जनजागृतीच्या बाबतीत इस्राईलने स्वतःला अव्वल सिद्ध केले आहे. मुख्य म्हणजे संपूर्ण जगात बुस्टर डोस देणारे पहिले राष्ट्र म्हणून इस्राईलची गणना होत आहे.
फायजर आणि बायोनटेक-एसई या इस्राईलला लस पुरवठा करणाऱ्या सर्वांत मोठ्या कंपन्या आहेत. लवकरच अमेरिका आणि युरोपमधील राष्ट्रांनाही बुस्टर डोससाठी नागरिकांना आवाहन करण्यासाठी आम्ही बोलणार आहोत, असे या दोन्ही कंपन्यांनी म्हटले आहे. युरोप आणि अमेरिकेत अद्याप बुस्टर डोसला मंजुरी मिळालेली नाही.
लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी संक्रमणाचा धोका वाढतो. त्यामुळे तिसऱ्या डोसची अर्थात बुस्टर डोसची आवश्यकता आहे, असे कंपनीने म्हटले आहे. इस्राईलमध्ये सरसकट सर्वांसाठी बुस्टर डोस कधी सुरू होणार, याबाबत अद्याप निश्चित धोरण ठरलेले नाही. कारण सध्या केवळ इम्युनिटी कमी असलेल्यांनाच तिसरा डोस दिला जात आहे. ९३ लाख लोकसंख्येचा इस्राईलमध्ये आपर्यंत ६० टक्क्यांहून अधिक नागरिकांना किमान पहिला डोस तरी देण्यात आलेला आहे.