विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
जम्मूतील भारतीय हवाई दलाच्या तळावर ड्रोनच्या सहाय्याने झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, हवाई दलासह इतर संरक्षण संस्थांच्या सुरक्षेचे नव्याने लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यात येणार आहे. भारतात हवाई दलाच्या तळावर पहिल्यांदाच झालेल्या ड्रोन हल्ल्याचे आव्हान ओळखून संरक्षण संस्थांची सुरक्षा सुनिश्चित करणे खूपच महत्त्वाचे झाले आहे. ड्रोन हल्ले रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर आता मंथन सुरू झाले आहे.
हल्ल्यात तंत्रज्ञानाचा वापर
जम्मूमध्ये हवाई दलाच्या तांत्रिक परिसरात झालेला ड्रोन हल्ला जवानांच्या सुरक्षेला नवा धोका निर्माण झाला आहे. हवाई तळच नव्हे, तर इतर संरक्षण संस्थांसाठी कमी उंचीवरून उडाणार्या ड्रोनला भेदणे सोपे काम नाही. यासाठी सुरक्षा यंत्रणांकडे तंत्रज्ञान आणि उपकरणांची कमतरता आहे. या दृष्टीने पाहिले तर जम्मूतील घटनेचा मोठा धोका टळला, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे सुरक्षा संस्थांवरील असे हल्ले रोखण्यासाठी लवकरच उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.
दहशतवाद्यांना तंत्रज्ञानाच्या सुविधा
सरहद्दीच्या पलीकडून दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणे अवघड होत असल्यामुळे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि पाक लष्कर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दहशतवादी हल्ले करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते ड्रोनसह इतर आधुनिक उपकरणे दहशतवाद्यांना पुरवत आहेत. सुरक्षा संस्थांच्या संरक्षणाच्या दृष्टीने अगदी खालून उड्डाण करणारे ड्रोन नवे आव्हान निर्माण करत आहे.
अमेरिकी संस्थाही फेल
सौदी अरब अमिरातमध्ये काही दिवसांपूर्वी तेल डेपोंवर ड्रोनद्वारे झालेल्या दहशतवाही हल्ल्याचे उदाहरण खूप जुने नाहीये. अमेरिकी गुप्तचर यंत्रणासुद्धा या ड्रोन क्षेपणास्त्रांना भेदू शकल्या नव्हत्या.
हेलिकॉप्टर हँगरच्या जवळ हल्ला
जम्मू हवाईत तळाच्या ज्या तांत्रिक परिसरात ड्रोनच्या सहाय्याने बॉम्ब हल्ला झाला, तो परिसर हवालई दलाच्या हेलिकॉप्टर हँगरच्या जवळच आहे. हवाई दलाचे ध्रुव हेलिकॉप्टर या तळावर तैनात आहेत. या हल्ल्यात खूप नुकसान झाले नाही हीच दिलासादायक गोष्ट आहे. जम्मूतील हल्ल्यानंतर हवाई दलाच्या श्रीनगर, अवंतिपुरा, अंबाला आणि पठाणकोटसारख्या सीमाभागातील तळांच्या सुरक्षेसाठी अलर्ट करण्यात आले आहे.
आव्हानांना रोखण्याची कसरत
हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ला सुरक्षा यंत्रणांनी गंभीरतेने घेतला आहे. पुढील संकटांचा सामना करण्यासाठी तयारी गतिमान केली आहे. जम्मूच्या घटनेत कोणत्याही उपकरणाचे नुकसान झालेले नाही. लष्करी आणि इतर संस्थांसोबत मिळून याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
संरक्षणमंत्रीही सक्रिय
संरक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाने यावर ट्विट करत सांगितले की, राजनाथ सिंह आणि हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल एच. एस. अरोरा यांच्याशी चर्चा केली. तसेच हवाई दलाने एअर मार्शल विक्रम सिंह यांना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी तत्काळ रवाना केले आहे.
दहशतवाद्यांना खुपतेय शांतता
बांगलादेश दौर्यावर गेलेले हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया जम्मूच्या हल्ल्याबाबत अपडेट घेत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया सुरू करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांमध्ये बाधा आणण्याचे काम दहशतवादी करत असल्याचे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे.
इतर हवाई तळांच्या सुरक्षेत वाढ
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाच्या उधमपूर, श्रीनगरच्या अवंतिपोरा, पठाणकोट आणि अंबाला तांत्रित हवाई तळांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआरएसएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), एनआय आणि पोलिसांच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी बैठक घेऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
ड्रोन नेमके आले कुठून
भारत-पाक आंतरराष्ट्रीय सरहद्दीच्या १८ किलोमीटर आत असलेल्या जम्मू हवाई तळावर हल्ल्यासाठी वापण्यात आलेले ड्रोन नेमके कुठून आले यावर तपास सुरू झाला आहे. यामध्ये कोणत्या प्रकारचे स्फोटके होती, हे ड्रोन पाकिस्तानातून आले की काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या समर्थक संघटनांचा यात हात आहे, ड्रोन रडारवर कसे दिसून आले नाही, अतिसंवेदनशील हवाई तळावरील जॅमरना ते रोखता आले नाही का, हे सर्व प्रश्न तपासाचा विषय आहे. सध्या असे मानण्यात येत आहे की हा हल्ला सतवारी येथील छावणीच्या जवळून झाला आहे.
जखमी जवानांच्या प्रकृतीची चौकशी
एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यांनी बांगलादेशहून फोनद्वारे जम्मूतील हल्ल्यात जखमी झालेल्या दोन जवानांच्या प्रकृतीची चौकशी केली. भदौरिया सध्या बांगलादेश दौर्यावर आहेत. दोन्ही जवान धोक्याच्या बाहेर आहेत. त्यांच्यावर सतवारी लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.