मुंबई – शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याशिवाय झालेले लैंगिक शोषणसुद्धा भारतीय दंड विधानच्या कलम ३७६ अंतर्गत बलात्काराच्याच व्याख्येत येते, अशी टिप्पणी करत मुंबई उच्च न्यायालयाने एका ३३ वर्षीय आरोपीची शिक्षा कायम ठेवली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांनी २०१९ मध्ये खालच्या न्यायालयाने आरोपीला ठोठावलेली १० वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षाही कायम ठेवली आहे.
गेल्या महिन्यात सुनावलेल्या शिक्षेत न्यायाधीशांनी जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशला आव्हान देणार्या याचिकेला फेटाळून लावले. एका गतिमंद महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरविले होते. पीडितेशी शारिरीक संबंध झाले नव्हते, असा दावा आरोपीने आव्हान दिलेल्या याचिकेत केला होता. परंतु न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तपासात लैंगिक शोषण केल्याचे सिद्ध झाले आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
लैंगिक शोषण झालेल्या ठिकाणावरून मिळालेले मातीचे नमुने तसेच आरोपीचे कपडे आणि पीडितेच्या शरिरावर मिळालेले मातीचे नमुने मेळ खातात. न्यायवैद्यक प्रयोगशाळेत त्याला दुजोरा मिळाला आहे. या पुराव्यावरून पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे सिद्ध झाल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. महिलेच्या गुप्तांगाला स्पर्श करणेसुद्धा या कायद्याच्या आधारांतर्गत गुन्हा असतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले.