नवी दिल्ली – गेल्या २६ वर्षांपासून युजर्सना इंटरनेटद्वारे ब्राउजिंगची सफर करून देणारे मायक्रोसॉफ्टचे इंटरनेट इक्सप्लोरर ब्राउजर पुढील वर्षी १५ जूनपासून बंद होणार आहे. विंडो ९५ सोबतच रिलिज झालेले हे वेब ब्राउजर आता निवृत्त होत आहे. १५ जून २०२२ नंतर त्याला बंद केले जाईल, असे मायक्रोसॉफ्टकडून ब्लॉग पोस्टद्वारे स्पष्ट करण्यात आले.
मायक्रोसॉफ्टमधील अधिकारी शॉन लिंडरसे सांगतात, सर्वात आधी विंडो १० ऑपरेटिंग सिस्टिमच्या काही व्हर्जनमध्ये इंटरनेट एक्सप्लोरर बंद केले जाईल. त्याच्या जागी सर्वात वेगवान आणि आधुनिक काळाच्या गरजेनुसार तयार करण्यात आलेले एज इंटरनेट ब्राउजरचा वापर केला जाऊ शकतो. जुने संकेस्थळे आणि अॅप्लिकेशनला समोर ठेवून मायक्रोसॉफ्ट एज ब्राउजरला तयार करण्यात आले आहे. त्याला कमीत कमी २०२९ पर्यंत तांत्रिक सपोर्ट दिला जाणार आहे.
१९९५ मध्ये आले होते एक्सप्लोरर
मायक्रोसॉफ्टने एक्सप्लोररला १९९५ मध्ये कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टिम विंडोज ९५ सोबत लॉन्च केले होते. हे ब्राउजर खूपच लोकप्रिय झाले होते. प्रतिस्पर्धी ब्राउजर नेटस्कॅपला संपवून साल २००० पर्यंत एक्सप्लोररने एकाधिकार स्थापन केला. २००२ मध्ये इंटरनेट ब्राउजरच्या ९५ टक्के बाजारावर एक्सप्लोररचाच कब्जा होता. त्यानंतर हळूहळू त्याच्या लोकप्रियतेत घट झाल्याचे पाहायला मिळाले. २०१० पर्यंत त्याची भागिदारी ५० टक्केच राहिली. यादरम्यान गुगल क्रोमसारख्या इंटरनेट ब्राउजर वेगाने लोकप्रिय झाले. आज गुगल क्रोमचा ६९ टक्के वाटा आहे. तर एक्सप्लोरर ८ टक्केच वापर होत आहे.