इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केरळच्या माजी आरोग्य मंत्री के. के. शैलेजा यांनी प्रतिष्ठित ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार नाकारला आहे. त्यांना कोरोना आणि निपाह विषाणूच्या प्रसारादरम्यान केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी२०२२ सालाचा ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कार देण्यात येणार होता. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या CPI(M) नेत्या शैलेजा यांनी पक्षाशी चर्चा केल्यानंतर या संदर्भात निर्णय घेतला आहे. या पुरस्काराला आशियाचा नोबल पुरस्कार असे देखील संबोधले जाते.
२०१६ ते २०२१ या कालावधीत शैलेजा केरळच्या आरोग्य मंत्री होत्या. याच काळात देशभरासह केरळात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला होता. केरळमध्ये करोनाचा प्रसार रोखण्यासाठी शैलेजा यांचे मोठे योगदान आहे. आशिया खंडाचा नोबल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील दरम्यान रॅमन मॅगसेसे अवार्ड फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी देण्यात येतो.
फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७ पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला. सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराची सुरुवात न्यू यॉर्कमधील रॉक फेलर भावंडांनी केली. प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
“मॅगसेसे हे कम्युनिस्ट विरोधी होते. एक व्यक्ती म्हणून माझा या पुरस्कारासाठी विचार करण्यात आला. मात्र मी एक राजकारणी असल्यामुळे यासंदर्भात पक्षाशी चर्चा केली. त्यानंतरच हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या पुरस्कारासाठी माझ्या नावाचा विचार करण्यात आला, याबाबत मी पुरस्कार समितीची आभारी आहे”, अशी प्रतिक्रिया शैलेजा यांनी दिली आहे. “मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीची सदस्य आहे. तसेच हा एक मोठा पुरस्कार असला तरी तो एका गैर सरकारी संस्थेकडून देण्यात येतो. ही संस्था सामान्यत: कम्युनिस्टांच्या तत्वांचे समर्थन करत नाही”, असेही शैलजा म्हणाल्या आहेत. ‘रॅमन मॅगसेसे’ हा आशियातील सर्वोच्च पुरस्कार आहे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना १९५७ पासून हा पुरस्कार देण्यात येतो.
कोरोनाच्या लढाईत चांगली कामगिरी करून दाखवणाऱ्या केरळ राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असता. कारण जगभरात कोरोनाचा कहर वाढत असताना भारतातील केरळने करोनावर उत्तम प्रकारे नियंत्रण मिळवले आहे. याचे श्रेय केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांना दिले जात आहे. आपल्या प्रभावी कामगिरीने शैलजा यांनी केरळला कोरोनाच्या प्रादुर्भावापासून रोखण्यात यश मिळवले. त्यांच्या या कामगिरीची दखल जगानेही घेतल्याचे अधोरेखित होत आहे. म्हणूनच आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांना संयुक्त राष्ट्राने पब्लिक सर्व्हिस डेनिमित्त व्याखानासाठी आमंत्रित केले होते.
This Indian Women Reject Ramon Magsaysay Award
Kerala Minister Comrade K K Shailaja Covid Work